Bombay High Court लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Bombay High Court लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १६ मार्च, २०२४

मुंबई उच्च न्यायालयाचा शासनाला मोठा धक्का, यांत्रिक स्वच्छतेच्या निविदांसह प्रशासकीय मान्यताही रद्द..

मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनावर गंभीर ताशेरे ओढत सार्वजनिक आरोग्य विभाग (६३८ कोटी रुपये )  आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या (१७५ कोटी रुपये)  यांत्रिक स्वच्छतेच्या दोन निविदा ज्यामुळे ठेकेदारांचा ८००० कोटी रुपयांपेक्षा जास्त फायदा होणार होता  त्या रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्या प्रशासकीय मान्यतेच्या आधारे या निविदा काढण्यात आल्या होत्या ती प्रशासकीय मान्यताही उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यामुळे राज्य शासनाच्या मनमानी पद्धतीने आणि विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून निविदा काढण्याच्या पद्धतीला मोठा धक्का बसला आहे. अर्थात यातून शासन काही धडा शिकतं की आपली मनमानी पद्धत पुढे चालू ठेवतं हे येणारा काळच ठरवेल. 


महाराष्ट्र शासनाने एरवी जिल्हावार काढली जाणारी स्वच्छतेची निविदा एकत्रित पद्धतीने आणि राज्य शासन पातळीवर काढण्याचे ठरवले. या निविदेसाठी जे दर प्रशासकीय मान्यतेद्वारे ठरवले होते. ते अत्यंत जास्त होते. म्हणजे मानवी पद्धतीने जे काम बांधिव मिळकतींसाठी ४  रुपये प्रति स्क्वेअर महिना आणि मोकळ्या मिळतीसाठी २  रुपये प्रति स्क्वेअर प्रति महिना असे केलं जायचं त्याचा दर अचानक अनुक्रमे ८४  आणि ९.५०  पैसे असा ठरवला होता. वास्तविक पाहता शासनाच्या नियमानुसार यांत्रिक पद्धतीने जर काम केलं त्याची किंमत ही मानवी पद्धतीने कामाच्या कमीत कमी २०  ते ३०% कमी यायला हवी. परंतु या निविदांमध्ये मात्र सदर कामाची किंमत १२  ते १५  पट वाढवलेली होती. ही प्रशासकीय मान्यता रद्द केल्याने शासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

घटनेतील तरतुदीनुसार सर्वांना समान न्याय हा कोणत्याही विषयाचा अविभाज्य भाग असतो. त्यामुळे राज्य शासनाचा कोणताही निर्णय किंवा कृत्य जे मनमानी आणि अकारण एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला व्यवसाय करण्यापासून वंचित ठरवेल ते घटनेचे उल्लंघन असेल.कारण त्यामुळे अशा व्यक्तींनी संस्थांना समान स्पर्धात्मक मैदानापासून वंचित ठेवून इतरांना त्याचा फायदा दिला जातो.. त्यामुळे सार्वजनिक निविदा निविदांच्या बाबतीत समान स्पर्धात्मक मैदान सुनिश्चित करणे आणि सर्वांना सहभागी होण्याची  समान दिली जाणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. अर्थात त्यामुळे कोणत्याही प्रकारे निविदा काढणाऱ्या राज्य शासन किंवा सार्वजनिक प्राधिकरणाच्या निविदेच्या विशिष्ट अटी निश्चित करण्याचा अधिकार कमी होतं  नाही. निविदेसाठी कोणत्या अटी आणि शर्ती असाव्यात याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाला आणि सार्वजनिक प्राधिकरणान आहे.तथापि त्याचा अर्थ असा नाही की राज्य किंवा सार्वजनिक प्राधिकरण न्याय करण्याशिवाय निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार किंवा एक किंवा अधिक निवडक संस्थासाठी मर्यादित करू शकते. योग्य आणि तर्कशुद्ध करण्याशिवाय कुणालाही स्पर्धेत सहभागी होण्यापासून वंचित ठेवले जात असेल तर ते घटनेच्या तत्त्वाविरुद्ध आहे असे मत उच्च न्यायालयाने आपल्या निकालात नोंदवले आहे. 

प्रस्तुत प्रकरणी फक्त सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यानाच आणि तेही केवळ प्रशासकीय कारणास्तव निविदा प्रक्रियेत सामील करण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे. आमच्या मते हे कारण न्याय नाही. हा तर्क मान्य करायचा झाला तर राज्य शासन आणि  सार्वजनिक प्राधिकरण त्यांना सोयीचे असेल त्या संस्थांना फक्त सार्वजनिक निविदा प्रक्रियेमध्ये सामील होऊ देतील. आमच्या मते त्यामुळे सर्वांना समान न्याय या तत्त्वाचा भंग तर होतोच आणि ते घटनेच्या कलम १४  उल्लंघन देखील आहे असे मत नोंदवून माननीय उच्च न्यायालयाने पुढे असे म्हटले आहे की राज्य शासनाचं म्हणणे "केवळ प्रशासकीय सोयीसाठी फक्त सार्वजनिक कंपन्यांना पात्र ठरविण्यात आले आहे" हे मान्य करता येण्याजोगे नाही. कारण स्वारस्य अभिरुची मध्ये स्पष्ट म्हटलं आहे की सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या या कामाची त्यांनी नेमलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून कामाची अंमलबजावणी करतील . या नेमलेल्या कंपन्या कायद्याने नियमानुसार त्यांची कागदपत्रे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे सुपूर्द करतील. म्हणजेच प्रत्यक्षात  सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या नव्हे  तर त्यांनी नेमलेल्या संस्था ज्यांना निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेण्यापासून वंचित ठेवण्यात  आले आहे त्याच प्रत्यक्षात काम करणार आहेत. अशाप्रकारे आमच्या मते ज्यांना निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यापासून वंचित ठेवले जात आहे आणि फक्त सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना सहभागी होण्याची  परवानगी दिली आहे त्याच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याना ज्यांना निविदा प्रक्रियेपासून वंचित ठेवलं आहे त्यांच्याकडून  काम करून घ्यायला परवानगी दिली जाते हे केवळ तर्कहीन मनमानी इतकेच नव्हे तर सदर बाब न्यायालयीन दखल घेण्यासाठी पात्र आहे.

तसेच \ राज्य शासनाने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रात नालेल्या  कंपन्या हा जो फरक केलाय तो कशाच्या आधारावर केला हे पाहणं ही आवश्यक आहे १. त्या दोन्ही मध्ये काही दृश्य फरक आहे का ? २. दोन्ही मध्ये फरक केल्याने स्वारस्य अभिरुचीमध्ये  नमूद केलेले उद्दिष्ट साध्य करण्यात काही बदल होणार आहे का ? आमच्या मते राज्य शासन या दोन्ही मधला फरक आणि यांत्रिक स्वच्छतेतून साध्य केलं करावयाचे उद्दिष्ट यातील फरक सिद्ध करण्यास पूर्णपणे नापास ठरलेलं आहे. राज्य शासनाने आमच्यासमोर असं काही ठेवलेलं नाही की ज्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या सार्वजनिक क्षेत्राबाहेरील कंपन्यांपेक्षा यांत्रिक स्वच्छतेचे काम काही वेगळे किंवा अधिक चांगलं करतील. खरंतर सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या या सार्वजनिक क्षेत्रात नसलेल्या कंपन्यांकडूनच काम करून घेणार आहे त्या स्वतः काही काम करणार नाहीत.याची नोंदही उच्च न्यायालयाने घेतली. 

याचिकाकर्त्यांची पात्रता आणि त्यांचा निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग नसणे या बाबींमुळे त्यांना निविदा प्रक्रियेमध्ये खोडा घालण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तसंच राज्य शासनाला निविदा  प्रक्रियेच्या अटी आणि शर्ती ठरवण्याच्या अधिकार आहेत हे राज्य शासनाचे म्हणणं आम्हाला योग्य वाटत नाही कारण राज्य शासनाने ठरवलेले अटी शर्ती या बेकायदा तर्कहीन असल्याचं आम्ही आधीच नमूद केलं आहे. 

वरील बाबी नमूद करून उच्च न्यायालयाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने काढलेल्या यांत्रिक स्वच्छतेच्या निविदा, ज्या प्रशासकीय मान्यता च्या आधारावर सदर निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली ती  प्रशासकीय मान्यता, तसेच राज्य शासनाने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून मागवलेली स्वारस्य अभिरुची या तिन्ही बाबी रद्द केल्या. 

या सर्व प्रकारामुळे राज्य शासनाला मोठा झटका बसला असला तरी त्यातून राज्यकर्ते किंवा प्रशासकीय अधिकारी काही धडा घेतील असं वाटत नाही. कारण उच्च न्यायालयाच्या निर्णयामधील सारांश लक्षात घेतला तर राज्य शासनाच्या अनेक निविदा ह्या रद्द होण्याला पात्र आहेत असे सिद्ध होतं. परंतु कंत्राटदारांच्या माध्यमातून आपले खिसे भरण्याचा उद्योग थांबवण्यासाठी ही मंडळी कोणत्याही थराला जायला तयार असतात. त्यामुळे सदर निर्णय हा केवळ दोन-तीन निविदापुरता  मर्यादित होता असं गृहीत धरून  ही मंडळी पुन्हा पुन्हा त्याच्या चुका किंवा गुन्हा करत राहतील


गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

माहिती अधिकार कट्ट्याच्या पाठपुराव्याला यश,द्वितीय अपीले आणि तक्रारींच्या सुनावणीसाठी वेळेची मर्यादा आखण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने माहिती आयोगाला फेब्रुवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्या पर्यंत माहिती आयुक्तांच्या सर्व रिक्त जागा भरल्यानंतर अधिक कार्यक्षम कारभारासाठी नियम तयार करण्याचे आदेश दिले आहेत. 


एकदा माहिती आयोग मुख्य माहिती आयुक्त आणि इतर आयुक्त यांच्यासह संपूर्ण क्षमतेने कार्य करू लागल्यानंतर माहिती अधिकार कायद्यानुसार दुसरी अपीलासाठी काही वाजवी वेळेची मर्यादा ठरवण्यासाठी काही विशिष्ट नियम तयार करणे योग्य ठरेल.त्यानुसार या आदेशाची प्रत माहिती पाठवण्यात येईल जेणेकरून ते वाजवी वेळेची मर्यादा आखण्यासाठी आणि जलद निकाल देण्यासाठी योग्य ती  पावले उचलतील असेही न्यायालायाने म्हटले आहे. 

माहिती अधिकार कट्ट्याच्या वतीने शैलेश गांधी,विजय,कुंभार,भास्कर प्रभू,विवेक वेलणकर,जुगल राठी,मोहम्मद अफझल यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने वरील निर्देश दिले. एडवोकेट सुनील आह्या यांनी माहिती अधिकार कट्ट्याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडली

याचिकेमध्ये मध्ये द्वितीय अपिलांच्या सुनावणीसाठी लागणारा मोठा कालावधी आणि त्यामुळे निकाल लागण्यासाठी होणारा प्रचंड विलंब याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांच्या वतीने माहिती अधिकार कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या तक्रारींची आणि द्वितीय अपिलांचे  निराकरण करण्यासाठी एक व्यवस्थित आणि कालबद्ध निराकरण यंत्रणेची गरज अधोरेखित करण्यात आलीहोती.

याचिकाकर्तांनी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या भूमिकेचा संदर्भ दिला, ज्यामध्ये पहिल्या अपीलच्या निकालपटासाठी असलेल्या ४५ दिवसांच्या वेळेच्या मर्यादेप्रमाणे दुसऱ्या अपील्सच्या निकालपटासाठीही ४५ दिवसांची वाजवी वेळेची मर्यादा सुचविली होती. तसेच, मद्रास उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयांनी आधीच दुसऱ्या अपील्सच्या निकालासाठी  नियम करण्याची आवश्यकता अधोरेखित केली होती.

मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त यांच्यासह सर्व रिक्त जागा २०२४ च्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भरल्या जाणार आहेत, त्यानंतर आयोग संपूर्ण क्षमतेने कार्य करेल, असं  राज्य शासनाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात  आले.

न्यायालयाने माहितीच्या अधिकार कायद्याच्या दृष्टीने द्वितीय अपिले आणी तक्रारींच्या जलद सुनावणीचे महत्त्व आणि त्यासाठी कालबद्ध मर्यादा असण्याची गरज अधोरेखित केली आणि माहिती आयोगाला त्यासाठी योग्य ती पवलेले उचलण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे न्यायालयाने माहिती आयोगाच्या वकीलांना ६  मार्च २०२४ रोजी होणाऱ्या पुढच्या सुनावणी पर्यंत या आदेशांच्या अनुपालनासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

पहिल्या अपिलाच्या सुनावणीसाठी ४५ दिवसाची कायदेशीर वेळेची मर्यादा असली तरी दुसऱ्या अपीलाच्या निकालासाठी अशी कोणतीही मर्यादा नाही त्यामुळे अशी मर्यादा आखून घेणे अत्यंत आवश्यक आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. 


बुधवार, २ मे, २०१८

डीएसके घोटाळा : शिरिष कुलकर्णी जामीन अर्जावर उद्या कोल्हापुरात तर परवा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी …

डी.एस.कुलकर्णी डेव्हलपर्सचे ( डीएसकेडीएल) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्यकार्यकारी अधिकारी शिरिष कुलकर्णी याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयाने ४ मे पर्यंत पुढे ढकलली.


दरम्यान कोल्हापूर येथे दाखल असलेल्या गुन्ह्या प्रकरणी शिरिष कुलकर्णीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या म्हणजे ३ मे रोजी कोल्हापूर न्यायालयात सुनावणी होणार आहे.
ठेविदार आणि सदनिका धारकांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी डीएसकेडीएल आणि त्यांच्या संचालकांच्या इतर कंपन्यांवर पुणे मुंबई आणि कोल्हापुर येथे गुन्हे दाखल आहेत .



पुण्यातील गुन्हाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आपली फसवणूक केल्याबद्दल ताशेरे ओढल्यानंतर आणि त्यांना अटकेपासून दिलेले संरक्षण काढून घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी दीपक आणि हेमंती यांना दिल्ली येथून अटक केली होती . आता दोघेही मागील २.५ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत.

याच प्रकरणात पुण्याच्या विशेष न्यायालयाने प्रकरणाचे गांभिर्य आणि ठेवीदारांचे हित लक्षात घेउन शिरिष कुलकर्णी याचा जामीन अर्ज फेटाळला होता.



त्यापूर्वी शिरीष कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला होता. शिरीष कुलकर्णी यांनी पुण्याच्या सेशन्स कोर्टात न जाता थेट हायकोर्टात धाव घेतल्याने प्रथम सेशन्स कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले होते.
त्यानंतर शिरीष कुलकर्णी याने केलेला  अटकपूर्व जामीन विशेष न्यायालयाने  फेटाळला होता.
हा अर्ज फेटाळताना  विशेष न्याया लयाने ‘या गुन्ह्यात शिरीष कुलकर्णी हे आरोपी आहेत, की नाही हे ठरविणे तपास अधिकाऱ्यांचे काम असून यामध्ये वृद्ध, निवृत्त अधिकाऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी लेखी म्हणणेदेखील सादर केले आहे. या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर ठेवीदारांची फसवणूक झाली आहे. प्राथमिक तपासात फसवणुकीची रक्कमही मोठी असल्याचे दिसत असल्याचे  निरिक्षण नोंदवले होते‘


त्यानंतर शिरिषने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आता ४ मे रोजी सुनावणी होणार आहे.

Related Stories



Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
                     
RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

सहकारी बॅका, पतसंस्थासह सर्व सहकारी संस्था माहिती अधिकाराच्या कक्षेत येतात - मुंबई उच्च न्यायालय

सहकारी बॅका, पतसंस्था माहितीचा अधिकार कक्षेत येताता अशा अर्थाचा एक निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा आधार घेउन हा निकाल दिला असल्याने सरसकट सर्वच सहाकारी संस्था माहिती अधिकाराच्या कक्षेत येत नसल्याचा कांगावा करणा-यांना या निर्णयाने सनसनीत चपराक बसली आहे.थळापलम सेवा सहकारी बँक लि., विरुद्ध केंद्र सरकार या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील एका संस्थेला माहितीचा अधिकार लागू होत नाहीत असा निर्णय दिला होता.परंतु त्याच निकालपत्राच्या परिच्छेद ५२ मध्ये न्यायालयाने म्हटले होते की माहिती अधिकार कायद्यातील कलम २ (ज) नुसार सहकार निंबधक हे सार्वजनिक प्राधिकरण आहे, त्यांना सहकार कायद्याने अनेक वैधानिक अधिकार दिलेले आहेत , माहिती अधिकार अधिनियमातील कलम २(ज ) च्या व्याखेत बसणारी सहकारी संस्थांची माहिती त्याच कायद्यातील कलम ८ च्या अधिन राहून नागरिकांना देणे हे कर्तव्य म्हणून त्यांच्यावर बंधनकारक आहे.





असे असले तरी काही माध्यमांना हाताशी धरून सरसकट कोणत्याच सहकारी संस्थेला माहितीचा अधिकार लागू नाही अशी अफवा काही लोकांनी पसरवली होती आणि सरसकट सर्वच सहकारी संस्थांनी सहकार विभागाच्या अधिका-यांनी माहिती नाकारायला सुरूवात केली होती.आता मुंबई उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्याच आणखी एका प्रकरणाचा आधार घेउन सहकारी संस्थाना माहितीचा अधिकार लागू होतो असा निकाल दिला असल्याने सहकारी बँका, सहकारी कारखाने, पतसंस्था आणि इतर सहकारी संस्थांना माहितीचा अधिकार लागू होतो यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यांतर्गत नोंदवलेल्या जळगाव जिल्हा नागरी सहकारी बॅका, पतसंस्था आणि इतर आर्थिक संस्था या संस्थांच्या निर्मिती पासून त्या अवसायानात निघेपर्यंत त्यांच्यावर सहकार कायद्यांतर्गत निर्माण केलेल्या प्राधिकरणाचे पूर्ण नियंत्रण असते.

महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यांतर्गत नोंदवलेल्या जळगाव सहकारी बॅका, पतसंस्था आणि आर्थिक संस्थाचा, इतर सहकारी संस्थांचा संघ या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपिठामधे एक याचिका दाखल करून न्यायालयाडे सदर संस्था माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम २ (ज) नुसार सार्वजनिक प्राधिकरण नाहित असे जाहिर करावे तसेच जनमाहीती अधिकारी आणि सार्वजनिक प्राधिकरणांना सहकारी संस्थांची माहिती देन्यास बंदी करावे अशा अर्थाची मागणी केली होती.

सहकारी बॅका या बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या कलम ३४ ए नुसार सुद्धा काही विशिष्ट प्रकारची माहिती ग्राहकांनी बॅकांकडे विश्वासाश्रित संबधामूळे दिली असल्याने ती गोपनीय असते त्यामूळे ती माहिती अधिकारांतर्गत देता येत नाही असा दावाही याचिकेत करण्यात आला होता. सहकारी संस्था माहितीचा अधिकार सर्वोच्च न्यायालय विजय कुंभार  

सदर याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने जयंतीलाल मिस्त्री प्रकरणात दिलेल्या आदेशाचाही उल्लेख केली. जयतीलाल प्रकरणात उच्च न्यालयाने आरबीआयने बँकाच्या हितापेक्षा जनहिताला जास्त प्राधान्य दिले पाहिजे असे सांगून सहकारी बँकानी माहिती अधिकाराच्या कक्षेत येतात असा निर्वाळा दिला होता.


Related Stories





Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis

RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199
Email – kvijay14@gmail.com
Website – http://surajya.org/



शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

देशद्रोहावरील परिपत्रकाने महाराष्ट्रातील ‘लोकसेवक व सरकारचे प्रतिनिधी‘ झाले स्वयंघोषीत सरकार !

देवेंद्र फडणवीस सरकारचा फतवा, टीका म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा, या अधिका-यांचे डोके ठिकाणावर आहे काय? , राजकारण्यांवरील टीका यापुढे 'देशद्रोह'?, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, राजकारण्यांवर टीका केल्यास देशद्रोहाचा गुन्हा?, नेत्यांवर टीका हा देशद्रोह ?, गृहविभागाचा अजब फतवा, देशद्रोहाचा गुन्हा ही हुकूमशाहीची सुरुवात. अशा प्रकारच्या मथळयांनी मागील दोन दिवसातील वर्तमानपत्रे भरली होती.


Photo Courtsey https://whennoodlesdream.files.wordpress.com

ज्येष्ठ समाज्सेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनादरम्यान काढलेल्या असीम त्रिवेदी यांच्या व्यंगचित्रांमधून तिरस्कार, तुच्छता तसेच राष्ट्रीय प्रतिकांची मानहानी होत असल्याचा आरोप होता व यानंतर असीम यांच्यावर भारतीय दंड विधानातील कलम १२४ अ अंतर्गत राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. टीकेची झोड उठल्यानंतर राज्य सरकारने असीम त्रिवेदी यांच्यावरील राष्ट्रदोहाचा गुन्हा मागे घेतला होता . त्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या जनहीत याचीकेदरम्यान महाराष्ट्राच्या महाधिवक्त्यांनी उच्च न्यायालयात शासन कलम १२४ संदर्भात पोलिंसांना मार्गदर्शक सूचना देईल असे सांगीतले होते .त्यानुसार हे परिपत्रक काढण्यात आले आहे.

या सर्व प्रकरणात  फ़डणवीस सरकारच्या मनीषेवरच शंका उपस्थित करण्यात आली. जणू काही या परिपत्रकाद्वारे शासनाने काहीतरी नवे आणि भयंकर जन्माला घातले आहे.त्यामूळे राज्यात आणिबाणी सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याचा सूरही अनेकांनी आळवला. भारतीय दंड संहितेतील कलम १२४ क चा वापर करताना सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या बाबतीत सर्वांच्याच प्रतिक्रिया तीव्र होत्या.अर्थात अगोदर काहीही न वाचता दिल्याने माझीही प्रतिक्रिया सुरुवातीला तशीच होती.मात्र प्रत्यक्ष वाचल्यानंतर माझे मत काही अंशी बदलले.

या सूचना पूर्णपणे निर्दोष नसल्या तरी त्यात एवढा गदारोळ करण्यासारखे काहीच नाही हे सहज लक्षात येते.या परिपत्रकातील काही तरतुदी या मूळ कायद्यातच नमूद आहेत. परिपत्रकामध्ये त्यांचा केवळ पुनरूच्चार करण्यात आला आहे इतकेच. आणि अर्थातच नेहमीप्रमाणे मंत्रालयातील परिपत्रकवाल्या साहित्यिकांनी म्हणजे बाबू मंडळींनी गडबड केली आहे. स्वत:च्या आणि सहका-यांच्या सोयीसाठी अशी गडबड ही मंडळी नेहमीच करत असतात आणि तीच खरी चिंतेची बाब आहे.

Photo Courtsey truthdive.com


मंत्रालयातून वेळोवेळी अनेक परिपत्रके काढली जात असतात अशा परिपत्रकांमधिल भाषा नमूनेदार असते.त्यात शब्दरचनेची अशी काही कमाल केलेली असते की भले भले भाषापंडितही लाजतील.कोणत्या परिपत्रकाचा नेमका कसा अर्थ लावायचा हे कदाचित एखाद्या भाषातज्ञाला समजणार नाही. शासकीय सेवकांना मात्र त्याचा आपल्याला हवा तसा अर्थ काढता येईल अशा पद्धतीनेच ती लिहिली जातात. हे परिपत्रकही त्याला अपवाद नाही.

ब्रिटीशांनी भारतीय नागरिकांवर अंकूश ठेवण्यासाठी राजद्रोहाच्या कायद्याची निर्मिती केली . स्वतंत्र भारताने लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य ही संकल्पना स्विकारल्याने लोक राजे झाले. अशा स्थितीत राजावरच त्याच्याच राज्याशी राजद्रोहाचा आरोप करणारे हे कलम लोकशाहीशी विसंगत वाटते . खरेतर ते पूर्वीच काढून टाकायला हवे होते.परंतु तसे घडले नाही हा  भाग अलाहिदा. आता फडणवीस सरकारच्या नावाने गळा काढणा-यांनी सदर कलम रद्द किंवा त्यात काही सुधारणा करण्यासंदर्भात पाठपुरावा केल्याचे आढळून येत नाही. असो.

महाराष्ट्र शासनाने  भारतीय दंड संहितेतील कलम १२४ (अ) चा वापर करताना पोलिसांनी खालील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे परिपत्रक काढले आहे.

१)तोंडी किंवा लेखी शब्दांद्वारे अथवा खुणांद्वारे, अगर दृश्य अथवा अन्य मार्गामार्फत केंद्र अथवा राज्य सरकार, लोकसेवक व सरकारचे प्रतिनिधी यांच्याबद्दल द्वेष, तुच्छता, अप्रीती, अवमान, असंतोष, शत्रुत्व, द्रोहभावना अथवा बेइमानी याची भावना दर्शवित असली पाहिजे. अशा प्रकारचे शब्द,खुणा किंवा प्रदर्शन अभिव्यक्ती हिंसाचारास प्रवृत्त करणारी किंवा जनतेत असंतोष निर्माण करणारी असली पाहिजे.

२) सदर लेखी किंवा तोंडी शब्द, खुणा अथवा कोणत्याही प्रकारची अभिव्यक्ती यामधून राजकारणी अथवा लोकसेवक हे शासनाचे प्रतिनिधी असल्याचे ध्वनित होईल, त्यावेळीच सदर कलम लावण्यात यावे.

३) शासनामध्ये कायदेशीर मार्गांनी फेरबदल घडवून आणण्याच्या उद्देशाने द्वेषाची - तुच्छतेची अगर अप्रीतीची भावना न चेतवता किंवा तसा प्रयत्न न करता त्यांच्याबद्दल नापसंती व्यक्त करण्यासाठी केलेली टीका कलम 124 क अंतर्गत राष्ट्रद्रोह म्हणून गणली जाऊ नये.

४) केवळ बिभत्सता अथवा अश्लीलता ही बाब कलम 124 क लावण्याच्या वेळी ग्राह्य धरण्यात येऊ नये.

५) सदर कलम लावण्याअगोदर संबंधित जिल्ह्यातील विधी अधिकारी यांचा लेखी सल्ला घेण्यात यावा. तद्नंतर दोन आठवड्यांच्या आत राज्याच्या सरकारी अहभयोक्ता यांचा सल्ला घेण्यात यावा.

आता कायद्यातील राजद्रोहाचे मूळ कलम पाहूया. ते असे आहे

भारतामध्ये कायदेशीर स्थापन झालेल्या शासनाबद्दल द्वेषाची किंवा तुच्छतेची भावना निर्माण करणे अगर तसा प्रयत्न करणे , अगर अप्रीतीची भावना चेतवणे , अगर प्रयत्न करणे , त्याकरता तोंडी किंवा लेखी शब्दामार्फत अथवा खुणांमार्फत अगर दृश्य देखाव्यामार्फत अगर अन्य मार्गाचा वापर करणे म्हणजे राजद्रोह‘

याला तीन स्पष्टीकरणे दिली आहेत

स्पष्टीकरण १ – ‘अप्रीती‘ या शब्दप्रयोगात द्रोहभावनेचा व शत्रुत्वाच्या भावनेचा समावेश आहे

स्पष्टीकरण २ – शासनामध्ये  कायदेशीर मार्गांनी फेरबदल घडवून आणण्याच्या उद्देशाने द्वेषाची - तुच्छतेची अगर अप्रीतीची भावना न चेतवता किंवा तसा प्रयत्न न करता त्यांच्याबद्दल नापसंती व्यक्त करण्यासाठी केलेली टीका या कलमाखाली अपराध ठरत नाही

स्पष्टीकरण ३ - द्वेषाची - तुच्छतेची अगर अप्रीतीची भावना न चेतवता किंवा तसा प्रयत्न न करता शासनाच्या प्रशासकीय किंवा अन्य कारवाईबद्दल नापसंती व्यक्त करण्यासाठी  केलेली टीका या कलमाखाली अपराध ठरत नाही.
Photo courtesy  http://www.binayaksen.net


शासनाचे परिपत्रक आणि मूळ कायद्यातील तरतुदी पाहिल्या तर परिपत्रकातील मुद्दा क्र.३,४ आणि ५ निकाली निघतात. कारण मुद्दा ४ आणि ५ बद्दल आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही आणि मुद्दा क्र ३ मूळ कायद्यातच आहे.आता उरतात ते परिपत्रकातील मुद्दा क्र. १ आणि २ . आणि इथेच खरी मेख आहे.हे दोन्ही मुद्दे एकमेकांशी संबधीत आहेत. मुद्दा क्र १ हा मुळ कायद्यातील तरतुदीनुसारच असायला हवा होता. मूळ कायद्यात फक्त ‘ कायदेशीर स्थापीत झालेल्या शासनाबद्दल‘ असा शब्दप्रयोग आहे . परिपत्रकात त्याला केंद्र व राज्य शासन म्हटले आहे . हेही मान्य करता येण्यासारखे आहे.परंतु यात अचानक ‘लोकसेवक व सरकारचे प्रतिनिधी‘ हे शब्द आले कुठून ? परिपत्रक काढून कायदा बदलण्याचा आणि लोकसेवक व सरकारचे प्रतिनिधी यांना शास्नाचा दर्जा देण्याचा उद्योग कुणी आणि का केला ? .

राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या मुद्यामध्येही
The words, signs or representations must bring the Government (Central or State) into hatred or contempt or must cause or attempt to cause disaffection, enmity or disloyalty to the Government and the words/signs/ representation must also be an incitement to violence or must be intended or tend to create public disorder or a reasonable apprehension of public disorder;
असे म्हटले आहे . त्यातही कुठे ‘लोकसेवक व सरकारचे प्रतिनिधी‘ हे शब्द नाहीत. मग हे शब्द परिपत्रकात आले कुठून. या मंडळींना सरकारचा दर्जा दिला कुणी? या शब्दांमूळे ‘लोकसेवक व सरकारचे प्रतिनिधी‘ स्वयंघोषीत सरकार झाले आहेत.आता मुद्दा क्र १ मधील लोकसेवक व सरकारचे प्रतिनिधी हे शब्द वगळल्यानंतर मुद्दा  क्र २ ला अर्थच उरत नाही.

थोडक्यात काय तर बाबू मंडळींनी आजपर्यंत केलेल्या अनेक प्रतापांपैकी हा एक प्रताप आहे . त्यामूळे त्याचा बाउ करण्याची गरज नाही.अर्थात या परिपत्रकाचा दुरूपयोग होणारच नाही याची खात्री मात्र कोणीही देउ शकणार नाही

Related Stories




 Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis


RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.


RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199
Email – kvijay14@gmail.com
Website – http://surajya.org