गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

माहिती अधिकार कट्ट्याच्या पाठपुराव्याला यश,द्वितीय अपीले आणि तक्रारींच्या सुनावणीसाठी वेळेची मर्यादा आखण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने माहिती आयोगाला फेब्रुवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्या पर्यंत माहिती आयुक्तांच्या सर्व रिक्त जागा भरल्यानंतर अधिक कार्यक्षम कारभारासाठी नियम तयार करण्याचे आदेश दिले आहेत. 


एकदा माहिती आयोग मुख्य माहिती आयुक्त आणि इतर आयुक्त यांच्यासह संपूर्ण क्षमतेने कार्य करू लागल्यानंतर माहिती अधिकार कायद्यानुसार दुसरी अपीलासाठी काही वाजवी वेळेची मर्यादा ठरवण्यासाठी काही विशिष्ट नियम तयार करणे योग्य ठरेल.त्यानुसार या आदेशाची प्रत माहिती पाठवण्यात येईल जेणेकरून ते वाजवी वेळेची मर्यादा आखण्यासाठी आणि जलद निकाल देण्यासाठी योग्य ती  पावले उचलतील असेही न्यायालायाने म्हटले आहे. 

माहिती अधिकार कट्ट्याच्या वतीने शैलेश गांधी,विजय,कुंभार,भास्कर प्रभू,विवेक वेलणकर,जुगल राठी,मोहम्मद अफझल यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने वरील निर्देश दिले. एडवोकेट सुनील आह्या यांनी माहिती अधिकार कट्ट्याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडली

याचिकेमध्ये मध्ये द्वितीय अपिलांच्या सुनावणीसाठी लागणारा मोठा कालावधी आणि त्यामुळे निकाल लागण्यासाठी होणारा प्रचंड विलंब याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांच्या वतीने माहिती अधिकार कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या तक्रारींची आणि द्वितीय अपिलांचे  निराकरण करण्यासाठी एक व्यवस्थित आणि कालबद्ध निराकरण यंत्रणेची गरज अधोरेखित करण्यात आलीहोती.

याचिकाकर्तांनी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या भूमिकेचा संदर्भ दिला, ज्यामध्ये पहिल्या अपीलच्या निकालपटासाठी असलेल्या ४५ दिवसांच्या वेळेच्या मर्यादेप्रमाणे दुसऱ्या अपील्सच्या निकालपटासाठीही ४५ दिवसांची वाजवी वेळेची मर्यादा सुचविली होती. तसेच, मद्रास उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयांनी आधीच दुसऱ्या अपील्सच्या निकालासाठी  नियम करण्याची आवश्यकता अधोरेखित केली होती.

मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त यांच्यासह सर्व रिक्त जागा २०२४ च्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भरल्या जाणार आहेत, त्यानंतर आयोग संपूर्ण क्षमतेने कार्य करेल, असं  राज्य शासनाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात  आले.

न्यायालयाने माहितीच्या अधिकार कायद्याच्या दृष्टीने द्वितीय अपिले आणी तक्रारींच्या जलद सुनावणीचे महत्त्व आणि त्यासाठी कालबद्ध मर्यादा असण्याची गरज अधोरेखित केली आणि माहिती आयोगाला त्यासाठी योग्य ती पवलेले उचलण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे न्यायालयाने माहिती आयोगाच्या वकीलांना ६  मार्च २०२४ रोजी होणाऱ्या पुढच्या सुनावणी पर्यंत या आदेशांच्या अनुपालनासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

पहिल्या अपिलाच्या सुनावणीसाठी ४५ दिवसाची कायदेशीर वेळेची मर्यादा असली तरी दुसऱ्या अपीलाच्या निकालासाठी अशी कोणतीही मर्यादा नाही त्यामुळे अशी मर्यादा आखून घेणे अत्यंत आवश्यक आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. 


सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

ठेवीदारांच्या होणाऱ्या फसवणुकीला शासनच जास्त जबाबदार

ठेवी बुडवणाऱ्या संस्था म्हणजे अशा बँका, पतसंस्था व खाजगी वित्तीयसंस्था ज्या ठेवीदारांच्या पैशांचा गैरवापर करतात आणि त्यांचे पैसे परत करत नाहीत. या संस्था सहसा उच्च व्याजदर देऊन ठेवीदारांना आकर्षित करतात, परंतु प्रत्यक्षात त्यांच्याकडे ते व्याजदर देण्याची क्षमता नसते. अशा संस्था अनेकदा जाणीवपूर्वक फसवणूक करताना आढळतात, फार कमी संस्था चुकीची धोरणे किंवा आर्थिक अस्थिरतेमुळे ठेवी बुडवतात.अशा संस्थांचं पीक वाढण्यास लोभी ठेवीदार आणि एजंट जबाबदार असतातच परंतु  किंबहुना त्याहीपेक्षा जास्त जबाबदार शासनच असतं.




शासनानेही आपल्या नागरिकांच संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे हे अनेकदा मान्य केलं आहे आणि त्या संदर्भात शासकीय यंत्रणांनी काय केलं पाहिजे याच्या सूचनाही संबधितांना दिल्या आहेत आहेत. मात्र त्याचं पालन होताना दिसत नाही. महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम,१९९९ मधील कलम ४ अन्वये, जर शासनाला अशी खात्री पटली असेल की, कुठलीही वित्तीय संस्था ठेवीदारांच्या ठेवी परत करू शकणार नाही, तर शासन त्या वित्तीय संस्थेच्या रकमा अथवा मालमत्ता जप्त करू शकतं.

५ एप्रिल २०१४ रोजी, शासनाने सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना आदेश दिले होते की, त्यांच्या परिक्षेत्रात कार्यरत असलेल्या अशा वित्तीय संस्थांची तपासणी करावी व ज्यांची गुंतवणूकदारांच्या वित्तीय ठेवी परत करण्याची क्षमता दिसून येत नाही अशी संस्था जर गुंतवणूकदारांचे हितसंरक्षण करण्यास निष्फळ ठरेल अशी खात्री पटली, तर त्या संस्थेचा अहवाल शासनास सादर करावा. परंतु अशा प्रकारे कार्यवाही कुणी केल्याचे ऐकिवात नाही.उलट अशा संस्थांच्या गैरकृत्यांकडे दुर्लक्ष करण्याचे किंबहुना त्यांना संरक्षण देण्याचे धोरण यंत्रणांनी राबविल्याचे दिसते.त्यामुळे अशा गुन्हेगारांना अटक होणे किंवा त्यांना शिक्षा होणे दूर राहिले उलट या गुन्हेगारांनी जामिनावर किंवा तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा आपल्या कारवाया सुरू ठेवल्याचे दिसून येते. 

सप्टेंबर २०१७ मध्ये, शासनाला आढळून आले की २०१४ च्या शासन निर्णयाचे पालन होत नाही. त्यामुळे, सर्व पोलीस घटक प्रमुखांना नवीन आदेशदेण्यात आले. या आदेशानुसार, पोलीस घटक प्रमुखांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या अशा वित्तीय संस्थांची माहिती जतन करावी. तसेच, अशा वित्तीय संस्थाच्या वतीने ठेवी स्विकारण्यासाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातीवर देखरेख ठेवावी. जर अशी संस्था ठेवीदारांच्या हितसंबंधास हानीकारक ठरेल, अशा रीतीने काम करत आहे अथवा ठेवीदारांची फसवणुक करण्याच्या इराद्याने काम करत असल्याचे निदर्शनास आले, तर अशा वित्तीय संस्थेविरुद्ध तात्काळ कार्यवाही करावी.

परंतु अशा प्रकरणाांमध्ये करावयाच्या कार्यवाहीबाबत सुसुत्रता व विविक्षित कार्यपध्दती नसल्याने शासनाने फेब्रुवारी २०१९ मध्ये आणखी सविस्तर सूचना निर्गमित केल्या. त्यानुसार

१. ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये तक्रारदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असते. बहूतांश वेळी, फसवणूक झालेले सर्वच ठेवीदार हे तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. यामुळे सुरुवातीस गुन्ह्याची व्याप्ती स्पष्ट होत नाही. म्हणून, सदर वित्तीय संस्थेने केलेल्या फसवणूकीबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती ठेवीदारांना ज्ञात होण्यासाठी तसेच ठेवीदारांनी तक्रार देण्यास पुढे यावे याकरीता संबंधीत पोलीस घटक प्रमुख यांनी प्रमुख वर्तमानपत्रात जाहीर प्रकटन द्यावे व  अशा गुन्ह्यांमध्ये बाधीत झालेल्या ठेविदारांकडून त्यांच्या ठेवीबाबत व अनुषंगीक आवश्यक असलेला तपशील भरुन घेण्यास सांगण्यात आले.

 

२. ज्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ च्या तरतूदी लागू करण्यात येतात, अशा गुन्ह्यांमध्ये, बाधीत झालेल्यांना त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी संबंधीत वित्तीय संस्थेच्या मालमत्ता ह्या तातडीने जप्त करणे आवश्यक असते. याकरीता, प्रथमत: संबंधीत वित्तीय संस्थेने गोळा केलेल्या ठेवीमधून स्वत:च्या नावाने किंवा कोणत्याही अन्य व्यक्तींच्या नावाने संपादन केला असल्याचा मानण्यात येणारा पैसा किंवा अन्य मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. तथापि, मालमत्ता किंवा पैसा जप्तीसाठी उपलब्ध नाही किंवा ठेवीची परत फेड करण्यासाठी पुरेशी नाही, असे दिसून आल्यास उक्त वित्तीय संस्थेचे प्रवर्तक, संचालक, भागीदार, व्यवस्थापक किंवा सदस्य यांच्या मालमत्ता (जंगम व स्थावर) जप्त करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे.

३. कायद्यातील या तरतूदीस अनुसरुन शासन अधिसूचनेसाठी आवश्यक प्रस्ताव संबंधीत पोलीस घटक प्रमुख (बुहन्मुंबई वगळून) यांनी संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा व त्याची प्रत अपर पोलीस महासंचालक (आर्थिक गुन्हे), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना सादर करावी. अपर पोलीस महासंचालक (आर्थिक गुन्हे) यांनी असे प्रस्ताव तपासुन त्यांचे अभिप्रायासह शासनास तातडीने सादर करावेत.

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रस्ताव प्रकरणपरत्वे, सह पोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) व सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांनी आवश्यक तपासणी करून त्यांच्या शिफारशींसह जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने शासनास सादर करावेत.

४. संबंधीत जिल्हाधिकारी यांनी असा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर, सदरहू प्रस्ताव तपासून तसेच नियुक्त करावयाच्या सक्षम प्राधिकारीच्या तपशीलासह तो शासनास समर्थनीय शिफारशींसह १५ दिवसात सादर करावा.

५. शासन स्तरावर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावावर शासन मान्यतेनंतर राजपत्रात अधिसूचना निर्गमित करण्यात येते. तद्नंतर, कायद्यातील कलम ५(३) प्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याकडून आवश्यक शपथपत्रासह विशेषीत न्यायालयामध्ये ३० दिवसात अर्ज करणे बंधनकारक आहे. ही कालमर्यादा लक्षात घेता तसेच, न्यायालयीन प्रक्रियेतील निकड लक्षात घेता सक्षम प्राधिकारी व आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी योग्य तो समन्वय सतत ठेवावा. याबाबत, संबंधीत पर्यवेक्षीय अधिकारी यांनी विशेष लक्ष पुरवावे.

असे सांगण्यात आले होते.मात्र यंत्रणांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. परिणामी गुन्हेगारांचे धैर्य वाढत गेले आणि पुन्हा पुन्हा अगदी एखाद्या गुन्ह्यात जामिनावर असतानाही तसेच गुन्हे पुन्हा पुन्हा करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

 

 

शनिवार, १ जुलै, २०२३

शिंदे फडणवीस सरकारचा एका दिवसात १११ शासन आदेश व ८० बदल्यांचे आदेश काढण्याचा विक्रम

शिंदे फडणवीस सरकारने काल म्हणजे ३० जून २०२३ रोजी एका दिवसात १११ शासन आदेश काढण्याचा विक्रम केला आहे. त्यातील जवळपास ८० आदेश हे बदली किंवा पदोन्नती संदर्भात आहेत आणि ३ आदेश हे समिती स्थापन करण्यासंदर्भात आहेत.या आदेशातून एकूण किती कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या गेल्या माहीत नाही, मात्र एका दिवसात जवळपास ८६  बदल्या या विनंतीवरून करण्यात आल्याचे दिसून येते.मागील एका वर्षात शासनाने ४४३ बदल्यांचे आदेश काढले त्यात ८९ आदेश हे विनंती बदल्यांचे आहेत.त्यातून प्रत्यक्षात किती जणांच्या बदल्या केल्या गेल्या याची आकडेवारी काढावी लागेल. एका आदेशात अनेकांची बदलीसुद्धा केली जाते. 


शासकीय अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिले होते त्यानुसार बदल्यांबाबत सक्षम प्राधीकाऱ्यास शिफारशी करण्यासाठी नागरी सेवा मंडळे  स्थापन करण्यात आली होती. मात्र १४  मे २०१४  रोजी नागरी सेवा मंडळे स्थापण्याच्या घेण्यात आलेल्या निर्णयाला अवघ्या सहा दिवसात म्हणजे २० मे २०१४ रोजी शासनाने स्थगिती दिली. ही स्थगिती कधी उठवली माहिती नाही. परंतु त्यानंतर बऱ्याच विभागांनी आपली नागरी सेवा मंडळे  स्थापन केल्याचे दिसून येते मात्र ती सगळी कागदावरच आहेत.

बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेप हा आजही ज्वलंत विषय आहे . काही बदल्या राजकीय सोयीपोटी तर काही राजकीय सुडापोटी केल्या जातात. विशेषतः क्रीम पोस्टिंग साठी बऱ्याचदा विनंती केली जाते.या विनंतीचे स्वरूप वेगवेगळे असते. त्याचप्रमाणे विनंती करणारा कोण आहे यावरही बदलीचे स्वरूप अवलंबून असते हे जगजाहीर आहे. मध्यंतरी मंत्रालयातील बदल्यांचे रेट कार्डही चर्चेत आले होते. 

या सगळ्या बदल्या महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५  नुसार केल्या गेल्याचे भासवले असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. सर्वसाधारणपणे बदल्या हया एप्रील किंवा मे महिन्यात करायच्या असतात. तीन वर्षाचा कालावधी पूर्ण नसलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची बदली करावयाची झाल्यास बदली प्राधिकाऱ्यांने विशिष्ट कारण नमूद करणे व त्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची सहमती घेणे आवश्यक असते. 

तसेच सामान्यपणे, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने त्याच्या पदस्थापनेचा पदावधी पूर्ण केला असल्याखेरीज त्याची बदली करण्यात येत  नाही.तसेच शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्या सामान्यपणे वर्षातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात करता येतात. सरकारी कर्मचाऱ्यांना अवेळी “बदलीच्या भीती”पासून मुक्त करण्यासाठी ही तरतूद कायद्यात करण्यात आली होती. या तरतुदीला वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे “बदलीची भीती” दूर राहिली आता सोयीनुसार बदल्या होऊ लागल्या आहेत. आता सोय कुणाची हे परिस्थितीनुरूप ठरत असते.

त्याचबरोबर अपवादा‍त्मक आणि विशेष प्रकरणांत, सक्षम प्राधिकाऱ्याला कारणे लेखी नमूद करून करणाऱ्या लगतच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने शासकीय कर्मचाऱ्याची, त्याचा पदावधी पूर्ण होण्यापूर्वी बदली करता येते.मात्र ही तरतूद अपवादा‍त्मक परिस्थितीत वापरायची असते.परतू आता शिंदे फडणवीस सरकारने अपवादालाच नियम बनवल्याचे दिसतंय.

शुक्रवार, ३० जून, २०२३

महाराष्ट्राच्या मंत्रालयात समित्यांची त्सुनामी ...

            शिंदे फडणवीस सरकारने अवघ्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये विविध विषयांशी संबधित २६४  इतक्या समित्या अवघ्या १ वर्षाच्या काळात स्थापन केल्या आहेत. अर्थात यामध्ये पुनर्गठीत, पुनर्रचित किंवा मुदतवाढ दिलेल्या समित्या यांचा समावेश नाही.त्यांचा समावेश केला तर तो आकडा ५२१ इतका होतो. एखाद्या विषयाला बगल द्यायची असेल, तो विषय टाळायचा असेल, किंवा इतर काही त्यामागे हेतू असेल तर त्या विषयावर समिती स्थापन करण्याचा हातखंडा शासन प्रशासनामध्ये वापरला जातो.

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्या नंतर सुरुवातीच्या काळात समित्या स्थापन करण्याचा प्रकार नगण्य असा होता. महाराष्ट्रातील पहिली समिती पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाची १९२ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर दुसरी समिती १९६३ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर १९६४ ते १९७० या काळात अवघ्या 3  समित्या स्थापन करण्यात आल्या.परंतु नंतर लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचं प्रमाण वाढलं आणि त्याबरोबरच समित्या स्थापनेचे प्रमाणही तेवढेच वाढले.

समित्या स्थापल्याने त्या विषयाचा पाठपुरावा करणाऱ्यांना बरं वाटतं. आपला विषय मार्गी लागला असं  वाटतं. परंतु प्रत्यक्षात तसं घडत नाही. नंतर समित्यांची पुनर्रचना, पुनर्गठण, मुदतवाढ असे प्रकार केले जातात. मुळात शासनात अपवाद वगळता समित्यांची गरज पडत नाही. प्रत्येक विषयासाठी समिती स्थापन करायची तर मग अधिकारी,लोकप्रतिनिधींनी आणि मंत्र्यांनी करायचं काय?.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मंत्रालयात समित्या स्थापन करण्याचे प्रमाण किती आणि कसे वाढले ते पहा.

१९६४ ते १९७० या ७ वर्षांच्या काळात अवघ्या ३ समित्यांची स्थापना करण्यात आली.त्यानंतर  १ जानेवारी १९७१  ते ३१  डिसेंबर १९७५ या ५ वर्षात कालावधीमध्ये अवघ्या ४ समित्यांचे गठन, पुनर्रचना किंवा पुनर्गठन करण्यात आले, १ जानेवारी १९७६  ते ३१ डिसेंबर १९० या कालावधीमध्ये ८ , जानेवारी १९८१  ते ३१  डिसेंबर ८५  या कालावधीत १८ समित्या, १ जानेवारी १९८६  ते ३१  डिसेंबर १९९०  या कालावधीमध्ये २३  समित्या , जानेवारी १९९१  ते ३१ डिसेंबर १९९५ या कालावधीमध्ये ३९  समित्यांचे गठन, पुनर्रचना किंवा पुनर्गठन करण्यात आले

त्यानंतर १ जानेवारी १९९६  ते ३१  डिसेंबर २००० या कालावधीमध्ये १२४  समित्या, १ जानेवारी २००१  ते ३१  डिसेंबर २००५ या कालावधीमध्ये २८०  समित्या, १ जानेवारी २००६  ते १ डिसेंबर २०१०  या कालावधीमध्ये ८२८ समित्या. १ जानेवारी २०११  ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधीमध्ये १२४३, १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेम्बर २०२०  या कालावधीत ३०१६ व १ जानेवारी २०२१ ते २९  जून २०२३ पर्यंत राज्य शासनाने १३२५ एवढ्या समित्या स्थापन केल्या किंवा त्यांची पुनर्रचना- पुनर्गठन करण्यात आले किंवा त्यासंदर्भात काहीतरी कार्यवाही करण्यात आली. यातील जवळपास दोन वर्षांचा कालावधी हा कोविड कालावधी होता. शिंदे फडणवीस सरकारने मागील एक वर्षात एकूण २६४  समित्या स्थापन केल्या. यामध्ये  पुनर्रचना- पुनर्गठन करण्यात आलेल्या किंवा मुदतवाढ दिलेल्या समित्यांचा समावेश नाही.  

शिंदे फडणवीस सरकारने मागील एक वर्षात स्थापन केलेल्या समित्या.

गुरुवार, २२ जून, २०२३

कोविड केंद्र गैरव्यवहार, चौकशी की राजकीय धुळवड ?

कोविड केंद्र गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी ठाकरे गटातील नेत्यांच्या निकटवर्तीयांसह १५ ठिकाणी छापे टाकले असले तरी या प्रकरणात किती दोषींवर कारवाई केली जाईल याबाबतीत मात्र शंका घ्यायला जागा आहे. आता यासंदर्भात राजकीय धुळवड सुरू असली उद्या राजकीय परिस्थिती बदलली तर ही धुळवड शांत होईल. तशी शंका घ्यायलाही  अनेक कारणे आहेत.

आता जरी चौकशी सुरू झाली असली तरी ती सर्वंकष होईल याची शक्यता कमी आहे. कारण या प्रकरणांमध्ये मुंबई,पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए अशा संस्था त्यांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी गुंतले आहेत. ज्या वेळेला हे प्रकरण घडलं त्यावेळेला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. मात्र त्यातील एकाही नगरसेवकांने या प्रकरणात लक्ष घातले नाही किंवा आवाज उठवला नाही.



१० सप्टेंबर २०२०  रोजी “पुण्याच्या जम्बो कोविड केंद्रामधील मधील मृतांचे गुन्हेगार मोकाट सुटणार?” अशा अर्थाचा लेख लिहिला होता .कोविड काळातील खरेदी आणि अनियमितता याबाबत अनेक सुरस चमत्कारिक कथा सांगितल्या जातात. अनेक मोठमोठ्या घोटाळ्यांबरोबरच अगदी २५ रुपयाचा साबण १२५ रुपयांना घेण्याचा पराक्रमही अनेक सार्वजनिक प्राधिकरणानी केलेला आहे. या सगळ्या घोटाळ्यामंध्ये आर्थिक गैरव्यवहार हा जरी महत्त्वाचा मुद्दा असला तरी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे ते या सगळ्या हलगर्जीपणामुळेअनेक नागरिकांचा मृत्यू झाला. त्याची जबाबदारी कोणावर आणि कशी सिद्ध करणार? मुळात ते सिद्ध करण्याची कुणाची इच्छा आहे का ?



पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर  लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला दिलेल्या कंत्राटीची माहिती घ्यायला मी सुरुवात केली.परंतु पुरेशी माहिती पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर नसल्याने आम्ही काही कार्यकर्त्यांनी मुख्य माहिती आयुक्तांना सर्वच प्राधिकरणांनी कोविडस संदर्भातील खरेदीची माहिती संकेतस्थळावर टाकण्याचे आदेश द्यावेत अशा अर्थाचे पत्र ६  सप्टेंबर २०२० रोजी लिहिले होते. त्यानंतर ९  सप्टेंबर २०२० ला पीएमआरडीएने मला लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेसचे पार्टनरशिप डीड दिले.त्यानंतर १० सप्टेंबर २०२०  रोजी पुण्याच्या जम्बो कोविड केंद्रामधील मधील मृतांचे गुन्हेगार मोकाट सुटणार?  अशा अर्थाचा घोटाळा सप्रमाण सिद्ध करणारा लेख  लिहिला. आणि अर्थातच त्यावेळेला या प्रकरणावर कंपनीला ब्लॅक लिस्ट आणि दंडात्मक कारवाई  करण्यापलीकडे काही झाले  नाही. 

आता पीएमआरडीए जरी ९ सप्टेंबर रोजी लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला ब्लॅक लिस्ट केले असे म्हणत असली तरी ज्या दिवशी मला पार्टनरशिप डीडची कॉपी दिली त्याच दिवशी त्यांना कसं काय ब्लॅकलिस्ट केलं गेलं? त्याआधी काय काय चौकशी केली?  याची माहिती मात्र अद्याप कोणालाही नाही. या सगळ्या तारखा बुचकळ्यात टाकणाऱ्या आहेत. 

१०  ऑगस्ट २०२० रोजी पीएमआरडीएने सदर संस्थेला लेटर ऑफ एक्सेप्टन्स दिले. त्यानंतर असं काय घडलं की अवघ्या  महिन्याभरात त्या कंपनीला ब्लॅक लिस्ट करावं  लागलं? . पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये चार चार आयएएस अधिकारी या कामावर लक्ष ठेउन होते. परंतु कुणीही या कंपनीच्या वैधतेबद्दल किंवा  अनुभवाबद्दल काहीही पाहिले नाही. याचाच अर्थ हे काम काहीही करून या कंपनीला द्यायचं असं ठरलेलं होतं. त्यामुळेच कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा लोकप्रतिनिधीने याची चौकशी केली नाही. त्यामुळेच आताच्या राज्यकर्त्यांना सोयीची तेवढीच चौकशी होईल अशी दाट शक्यता आहे. 


Also Read





RTI KATTA

RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their proble to Information act, Every Sunday Zoom Meeting at 10.30 AM

Vijay Kumbhar

RTI Resource Person, RTI Columnist Phone-9923299199

Website - http://vijaykumbhar.com

http://surajya.org/

Email -kvijay14@gmail.com Facebook - https://www.facebook.com/kvijay14

Twitter https://twitter.com/Vijaykumbhar62 YouTube - https://www.youtube.com/user/kvijay14