विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: डीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का ?

Wednesday, August 23, 2017

डीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का ?डीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का ?

हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या माध्यमातून सुमारे ४५० ते ५०० कोटी रुपये मिळाले!

अगदी अलिकडे म्हणजे जुन जुलै महिन्यात न्याती आणि एक्झर्बियाला जमिनी विकून सर्वसाधारण पणे ७३ कोटी आणि कर्जरुपाने ८५ कोटी असे साधारणपणे १५६ कोटी रुपये त्यांना मिळाले.

परंतु त्यातील एकही पैसा त्यांनी लोकांची देणी भागवण्यासाठी किंवा कर्मचा-यांचे पगार देण्यासाठी वापरला नाही.

मग या पैशांचे झाले काय?

अर्थातच हे पैसे डीएसके कुटुंबियांच्या भागीदारी कंपन्यांकडे वळवण्यात आले.


वरील गहाणपत्र बघितले तर सहज लक्षात येते की डीसके कुटुंबियांच्या भागीदारी कंपन्या डी.एस.कुलकर्णि आणि कंपनी आणि डी.एस .के असोसिएट्स यांनी ८५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.

या दोन्ही कंपन्यांचे स्वत: डीएसके आणि त्यांचा मुलगा शिरिष भागीदार आहेत.

त्याआधी सप्टेंबर २०१६ मध्ये किरक़टवाडी येथील आनंदघन या प्रकल्पासाठी सुमारे १०५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले .


ते डीएसके ग्लोबल एज्युकेशन आणि रिसर्च लिमिटेड या कंपनीकडे गेले.

या कंपन्यांचे डायरेक्टर हेमंती, शिरिष कुलकर्णी आणि त्यांची पत्नी तन्वी डायरेक्टर आहेत.

डीएसकेंच्या आजपर्यंतच्या सर्व प्रकल्पांचा, त्यांच्या कामांचा आणि फायद्याचा अभ्यास केल्यास  डी. एस कुलकर्णी डेवलपर्स लिमिटेड  ( डीएसकेडीएल) या सेबीकडे नोंदणीकृत पब्लिक लिमिटेड कंपनीच्या बहूतेक सर्व प्रकल्पातील निधी आणि फायदा येनकेन प्रकारे त्यांच्या कुटुंबियांच्या भागीदारी कंपन्यांकडे वळवल्याचे दिसते !

लोकांच्या पैश्यातून त्यांनी पब्लिक लिमिटेड कंपनीची स्थापन केली पण त्याचा फायदा लोकांना – भागधारकांना किती आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावावरील कंपन्यांना किती झाला याचा अभ्यास केल्यास अनेक चमत्कारीक बाबी लक्षात येतात.

डीएसकेंचा गगनचुंबी असा मुंबईतील 'दुर्गामाता टॉवर' हाप्रकल्प 'अंबायन्स व्हेन्चर्स प्रायव्हेट लिमिटेड' नावाच्या वैयक्तिक कंपनीच्या मालकीचा आहे!

तो फक्त'डीएसके' ब्रँड वर विकला गेला!

परंतु त्यातून पब्लिक लिमिटेड कंपनीला काय मिळाले ? तर काहीही नाही.

डीएसके ड्रीमसिटी मध्ये तर पब्लिक लिमीटेड कपंनीच्या शेयर होल्डर्सचे सुमारे दोनशे कोटी रुपये जमिन खरेदीच्याचवेळी सौ. हेमंती कुलकर्णी व त्यांच्या बहिणी सौ. अनुराधा पुरंदरे आणि मुद्गल ह्यांच्या वैयक्तिक डीएसकुलकर्णी आणि कंपनीकडे वळता झाला.

त्या कंपन्यांमध्ये वैयक्तिक डीएसके भागीदार देखिल नव्हते!
आणि हे प्रकार तिथेच थांबले नाहीत!

२०१५-१६ वर्षाचा डीएसकेडील चा वार्षिक अहवाल बघता त्यातही ३०० कोटी रूपये त्याच डीएसकुलकर्णी आणि कंपनीला देण्याचं क़बूल केलेलं दिसतयं!

ते कशाबद्दल ह्याचा कुठेही उल्लेख नाही!

भविष्यातही या कंपन्यांना आणखी शेकडो रुपये देण्यात येणार आहेत.

इतकेच नव्हे तर आपापसातील काही करारांमूळे भविष्यात काही अडचणी उद्भवल्यास त्याची जबाबदारी पब्लिक लिमिटेड कंपनीवर टाकण्यात आली आहे आणि कुटुंबियांच्या भागीदारी कंपन्यांना मात्र नुकसान, व्याज किंवा इतर त्रासांपासून मुक्त ठेवण्यात ( इन्डेम्नीफाय) आले आहे.

याचा अर्थ फायदा घ्यायला कुटुंबियांच्या कंपन्या आणि नुकसानीची जबाबदारी मात्र पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणजे लोकांचे पैसे.

आणि विशेष म्हणजे शेकडो कोटींचे उत्पन्न असलेल्या ह्या कंपन्यांमध्ये मध्ये एकही कर्मचारी नाही किंवा कंपन्यांच स्वत:चं ऑफ़िस देखिल नाही आणि ते शेकडो कोटी रुपये कुठे गेले ह्याचा थांगपत्ता देखील नाही!

ड्रिमसिटी प्रकल्पाला भेट दिलीअसता लक्षात येईल की जागेवर कुठलेही बांधकाम झालेले नाही, ना कुठे ट्राम आहे, ना कुठे नदी, ना कुठे डीएसकेंच्या शब्दात झुळझुळणारे कारंजे!

मग ज्या प्रकल्पाच्या बांधकामावर प्रत्यक्ष खर्चच झालेला नाही त्या  प्रकल्पाच्या अपयशामुळे डीएसके अडचणीत येतीलच कसे?

डीएसकेंच्याच शब्दात त्यांच्या कंपनीची मालमत्ता 'दहा हज़ार कोटींची’ रुपयांची आहे!

इतकी मालमत्ता असलेली कंपनी दोनशे कोटींचे नुकसान नक्कीच सहन करू शकते

डीएसकेडीएलचे वार्षिक अहवाल वाचल्यास सहज लक्षात येते की डीएसकेडीएल कंपनीच्या प्रत्येक प्रकल्पात त्यांची वैयक्तिक कंपनी भागीदार आहे.

आणि डीएसकेडीलसह सर्व कंपन्यांचे कुलमुखत्यारपत्र हेमंती कुलकर्णी यांच्याकडे असल्याचे दिसते.

 अगदी डीएसके विश्व चे सर्व अधिकार न्याती डेवलपर्सकडे हस्तांतरीत करताना डीएसके विश्व मधील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी सुद्धा आपले कुलमुखत्यारपत्र हेमंती कुलकर्णी यांना दिल्याचे दिसते.

या कंपन्यांना काहीही काम न करता आणि  विनाखर्च फायद्यातला हिस्सा मिळत असतो.

डीएसकेंच्या इतर सर्व  प्रकल्पांची चौकशी केल्यास ते ९०% विकले गेलेले आढळतात आणि जागेवर बांधकाम मात्र २०% देखिल नाही!

त्यांच्याच वार्षिक अहवालाचं वाचन केल्यास लक्षात येते की फुरसूंगी येथील जागा सोडल्यास त्यांची बालेवाडी येथे मोठी जागा होती जी 'एक्झर्बिया कंपनीला' विकल्याचे सरकारी कागदपत्रावरून दिसून येते.

घरकूल लॉन्स विकले गेले आहे.

 पेरणे येथे त्यांनी त्यांच्याच एका व्हिडीओमध्ये सहा हज़ार घरे बांधणार असल्याचे सांगीतले होते ती जागाही विकल्याचे आढळते!

फुरसंगी येथील जागा देखिल 'सेबी' ला 'एनसीडी' इश्यू आणताना गहाण ठेवल्याचे दिसते. ज्या इश्यूचे व्याज देखिल कंपनीने थकवले आहे!


डीएसके विश्व मधील जागा देखिल 'न्याती कंपनीस' दिलेली आहे.

असे असेल तर मग डीएसकेंची दहा हज़ारकोटी रूपयांची मालमता आहे तरी कुठे ?

आणि त्या मालमत्तेवर एफडी होल्डरर्सचे पैसे भागवण्याएवढेसुद्धा कर्ज का मिळत नाही?

ठेवीदार, गुंतवणूकदार, बँका, ग्राहक, सप्लायर, कॉंट्रॅक्टर, पोलीस,मिडीया सर्वांना फक्त डीएसके आणि हेमंती कुलकर्णी सामोरे जातात, कंपनीत कोणीही जबाबदार अधिकारी नाही मग ड्रीमसिटी सारखा महाकाय प्रकल्प कंपनी पुर्ण करेलच कसा?

त्यावरूनच लक्षात येते की ड्रीमसिटी प्रकल्प हे काही डीसकेंच्या अपयशाचे कारण नाही.

अपयशाचे खरे कारण आहे ते डीसके आणि कुटुंबियांचे बेजबाबदार् वर्तन आणि आलीशान रहाणीमान !

कंपनी रेकार्डवरून त्यांची इतर कुठेही एव्हढी मालमत्ता असल्याचे आढळून येत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या काही थोड्याफार मालमत्ता आहेत त्या सर्वच्या सर्व मालमत्तांवर कर्ज घेतलेले आहे!

या सर्व मालमत्ता विकून फक्त ठेविदारांचे देण्यासाठीही पैसे उभे रहाणार नाहीत.

कंपनीमध्ये फक्त आठ हजार सामान्य ठेवीदारांचे फक्त सव्वा चारशे कोटीच नाही तर वित्तीय संस्थांचे हजारो कोटी रूपये, एनसीडी इश्यूचे दीडशे कोटी रूपये, खाजगी गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी रूपये अडकले आहेत!वित्तीय संस्थांनी सुरक्षेपोटी मालमत्ता लिहून घेतल्या आहेत, एनसीडी इश्यू पोटी सेबीने फुरसुंगीतील मालमत्ता लिहून घेतली आहे!

खाजगी व्यापारी व गुंतवणूकदारांनी देखील फुरसूंगीतील जागा लिहून घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे तीच मालमत्ता 'सेबी'ला देखील लिहून दिलेली आहे!

हा मोठा गुन्हा आहे!

राहता राहीला गरीब सामान्य ठेवीदार ज्याला कुठलेच कायद्या शिवाय कुठलेच संरक्षण नाही.

खरेतर गुंतवणूकदारांनी एफडीमध्ये पैसे गुंतवले ते डीएसके ब्रँडला भुलून.

आपण ज्या कंपनीत पैसे गुंतवतोय त्या कंपन्या डीएसकेंच्या कुटुंबियांच्या भागीदारी कंपन्या असून त्यांना एफडी स्विकारण्याची परवानगी नव्हती ते गुंतवणूकदारांना माहिती नव्हते हे समजण्यासारखे आहे.

परंतु डीएसके आणि त्यांच्या कुटुंबियांना ते नक्की माहिती होते.

असे असताना डीएसके आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेकायदा ठेवी का स्विकारल्या?

कारण उघड आहे.

डीएसके आणि त्यांच्या कुटुंबियांना कुटुंबियांना ठेविदार कोण आहेत याच्याशी काही देणे घेणे नव्हते.
त्यांना दिसत होता तो केवळ गुंतवणूकदारांचा पैसा!

अशा स्थितीत फक्त आणि फक्त न्यायालय आणि पोलीस खातेच ह्या सर्व प्रकाराची शहानिशा करून सामान्य ठेवादारांना न्याय देऊ शकते!

अशा प्रकरणात ठेविदारांना शब्दांच्या भूलभुलैयात गुंतवून वेळ मारून नेण्यात कंपन्या नेहमीच यशस्वी झाल्याचे दिसते.

त्यामूळे आतापर्यंत हजारो ठेविदारांचे पैसे बुडाले आहेत.

गोड बोलण्याला भुलण्यापेक्षा आणि भावनेच्या आहारी जाण्यापेक्षा. वस्तुस्थितीला सामोरे गेले  पाहिजे.
पुण्यातील टेंपल रोज प्रकरण ताजे आहे .

सजनानी नावाचा व्यापा-याने शेवट पर्यंत गुंतवणूकदारांना झुलवत ठेवले होते.

मात्र एका गुंतवणूकदार महिलेने तक्रार करताच पोलिसांनी एमपीआयडी कायदा लावला.

आणि त्यानंतर टेंपल रोजच्या संचालकांना अटक तर झालीच. परंतु कंपनीची सुमारे ११०० एकर  जमिन जप्त करण्यात आली. १०० च्या वर बँक खाती गोठवण्यात आली.

आता ही सर्व मालमत्त्ता न्यायालयाच्या संमतीने विकून ठेविदारांना त्यांचे पैसे परत दिले जातील.

एमपीआयडी म्हणजे महाराष्ट्र गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण या कायद्यात गुंतवणूकदारांच्या हिताला अनन्यसाधारण महत्व आहे .

कुणीही कुठेही गुंतवणूकदारांचा पैसा वळवला असेल तरी तो परत मिळवण्याची क्षमता फक्त याच  कायद्यात आहे.

गुंतवणुकदारांना गेले दीड वर्षाहून अधिक काळ व्याजही न देणारे, हजारो मध्यमवर्गीय मराठी ग्राहकांचे घराचे स्वप्न अंधारात ठेवणारे आणि स्वत:च्या आलिशान रहाणीमानात तसूभरही  कमी न करता  डीएसके लोकांकडे विशेषत: 'ब्राम्हणांकडे' लोकवर्गणीची याचना करताहेत.आता जर वेळीच जागे झाले नाहीत आणि डीसकेंच्या जातीच्या भुलथापांना बळी पडले तर लोकांनी गुंतवलेल्या ‘एफडी’ लोकवर्गणी ठरण्याची शक्यता जास्त आहे!

डीएसके म्हणजे प्रचंड अलंकारिक आणि कल्पक जाहिरातींमधून निर्माण झालेला 'ब्रँड'!

माझ्या ब्लॉगपोस्टद्वारे मी ह्या 'ब्रँड' मागचा खोटेपणा उघडकीस आणल्या नंतर काही विचित्र प्रतिक्रिया  आल्या!

डीएसके हा गरिबीतून वर आलेला मराठीमाणूस आहे, त्याचं मंदीमुळे व महत्वाकांक्षी 'ड्रिमसिटी' च्या अपयशामुळे व्यवसायात नुक़सान झालयं.

पण ते ग़रीब मराठी लोकांचे पैसे नक्कीच परत देऊ इच्छितात. वगैरे वगैरे.

आता वरील मुद्दे वाचल्यानंतर डीएसकेंची लोकांचे पैसे परत द्याचची इच्छा आहे हे म्हणने पटते तुम्हाला?

Related Story

डीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार ?

Is DSK exploiting Investors, FD holders and flat buyers ?

DSKDL public Limited Company or Criminal Enterprise?


Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis

RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     – kvijay14@gmail.com


1 comment:

  1. This xberia is another bubble waiting to burst

    ReplyDelete