शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

डीएसके घोटाळा: तक्रारी रोखण्यासाठी डीएसकेंचे गुंतवणूकदारांना गा-हाणे ….

डीएसकेंच्या डोक़्यातून बहूतेक निवडणूकीची हवा अद्याप गेलेली दिसत नाही.म्हणूनच त्यांनी कदाचित आपल्याला ३००० गुंतवणूकदारांचा पाठिंबा असल्याचे आणि आपण सर्वांचे पैसे परत देणार असल्याचे एका पत्रकाद्वारे आणि व्हॉट्सॲपद्वारे जाहिर केले आहे.


अर्थात डीएसकेंनी असे आश्वासन काही पहिल्यांदाच दिले आहे अशातला भाग नाही,यापूर्वी त्यांनी तीच कॅसेट अनेकदा वाजवली आहे.अणि हे माहित असल्याने अनेकांनी त्यांच्या या आश्वासनाची खिल्ली उडवली आहे.


असो, पुढे जाण्याआधी आपण डीएसकेंनी काय आवाहन केले त्यावर सविस्तर उहापोह करू 


१. डीएसके म्हणतात ,माननीय कोर्टाच्या आदेशाने लवकरच मी सर्वांचे पैसे परत देण्यास सुरूवात करणार आहे. यामध्ये ज्यांनी माझ्या विरूध्द तक्रार केली व ज्यांनी तक्रार केली नाही अशा सर्वच ठेवीदारांचे पैसे मी देणार आहे. 

आता डीएसके कोर्टाच्या आदेशाने लवकरच मी सर्वांचे पैसे परत देण्यास सुरूवात करणार म्हणजे नेमके काय करणार? कोर्ट काही डीएसकेंना गुंतवणूकदारांचे पैसे परत करा असा आदेश देणार नाही. फारतर तर कोर्ट स्वत:मार्फत ज्यांनी तक्रार केलीय त्यांचे पैसे परत देण्याची व्यवस्था करेल आणि त्यासाठी डीएसकेंकडून पैसे वसूल केले जातील, त्यांची मालमत्ता जप्त करून ती विकल्यानंतर किंवा इतरत्र पैसे वळवले असल्यास त्याचा पोलिसांमर्फत शोध घेउन त्यातून गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याची व्यवस्था करेल.

आणि अर्थातच डीएसकेंना लोकांचे पैसे परत करायचे असतील तर त्यासाठी कोर्टाच्या आदेशाची गरजच काय?कोर्टाच्या आदेशाशिवाय सुद्धा ते गुंतवणूकदारांचे पैसे परत करू शकतात. त्यांना आतापर्यंत कुणी अडवले होते?

२. डीएसके असही म्हणतात की , काही दुष्ट माणसं, ठेवीदारांना भीती घालत आहेत. "पोलीसात तक्रार करणार्‍यांचेच पैसे मिळणार आहेत" असे सांगून ठेवीदारांना भयभीत करून, पोलीसात तक्रार करण्यास भाग पाडत आहेत. परंतु यात काही तथ्य नाही.या निवेदनाद्वारे मी सर्व ठेवीदारांना आवाहन करतो की तुम्ही कृपया घाबरून जाऊ नका. तुमचे सर्वांचे पैसे मा. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे परत देण्यास लवकरच सुरूवात होईल.

आता डीएसके कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पैसे परत देणार म्हणजे नेमके काय कारणार याचा नेमका अर्थ काय ? हे कुणालाच समजलेले नाही. 

कोर्टाच्या आदेशाप्रमाणे परत देण्यास लवकरच सुरूवात होईल म्हणजे कोर्टाच्या आदेशापर्यंत लोकांनी गप्पा बसायचे का? 

एकाने डीएसकेंच्या या आवाहनाला उत्तर देताना म्हटले आहे ’ सर, मी एफआयआर केलेला नाही, मी कोर्टाच्या आदेशाची वाट का पाहू?मी ४ ऑक्टोबरला १२ इन्स्टॉलमेंटचा फॉर्म भरून दिला , १५  ते २० ऑक्टोबरपासून पहिला हफ्ता सुरू होणार होता तो झाला नाही.

हे एक नाही अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपली मुदत ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर पैसे न मिळाल्याने डीएसकेंच्या आश्वासनाला भुलून १२/२४/३६ हफ्त्यात पैसे स्विकारण्यास मंजूरी दिली आणि ज्यांचे हफ्ते अद्यापही सुरू झालेले नाहीत. 

अगदी डीएसकेंच्या लेखापरिक्षकांनीसुद्धा त्यांच्या २०१६-२०१७ च्या अहवालात ‘डीएसकेंचे ३१ मार्च २०१७ रोजी १६४२ मुदत ठेवी धारकांचे सुमारे १५.०६ कोटी रुपये देणे थकीत होते. या देण्यापैकी १०.३८ कोटी रुपये देण्यासाठी कंपनीने ४५० धनादेश दिले होते.अर्थातच जे वठले नाहीत‘ असा उल्लेख आहे.

या ठेवी फक्त डी. एस . कुलकर्णी डेव्हलपर्स या कंपनीच्या होत्या. ज्या कंपन्यांना ठेवी स्विकारण्याची परवानगी नव्हती त्यांनी किती रकमेच्या ठेवी स्विकारल्या याचा थांगपत्ता नाही.

परंतु आपण दिलेले धनादेश वठत नाहीत हे माहिते असतानाही डीएसकेंनी ते देणे थांबवले तर नाहीच उलट अजूनही ते १२/२४/३६ हफ्त्यात पैसे स्विकारण्यास लोकांना भाग पाडत आहेत. 

३. आता डीएसकेंच्या म्हणण्याप्रमाणे,  काही दुष्ट माणसं, ठेवीदारांना भीती घालत आहेत. "पोलीसात तक्रार करणार्‍यांचेच पैसे मिळणार आहेत" असे सांगून ठेवीदारांना भयभीत करून, पोलीसात तक्रार करण्यास भाग पाडत आहेत.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार , पुणे पोलिसांनी तर डीएसकेंविरोधातील सुमारे ३५०० तक्रारी स्विकारल्या आहेत आणि स्विकारत आहेत शिवाय त्यांनी शनिवारी दिनांक ९ डीसेंबर रोजी गुंतवणूकरांशी संवाद आयोजीत केला आहे ज्यामध्ये गुंतवणूकदारांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या जाणार आहेत.

कोल्हापुर पोलिसांनीही डीएसकेंविरोधात गुन्हा दाखल केला असून गुंतवणूकदारांना माहिती देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. 

४. डीएसकेंच्या म्हणण्यानुसार दुष्ट लोकांचे उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे डीएसके संपविणे. यासाठीच कधी ठेवीदार तर कधी फ्लॅटधारक तर कधी अन्य कोणी, यांना चिथावून ते त्यांना अधिक अडचणीत आणत आहेत. 

कोण असावित ही दुष्ट माणसं ? खरेतर डीएसके म्हणजे आपल्या फसव्या परंतू गोड वाणीने अजातशत्रु राहिलेला माणूस! आपल्या गोड बोलण्याने त्यांनी आयुष्यभर जगातील सर्व बांधकाम व्यावसायिक कसे नालायक आहेत आणि आपणच कसे उत्तम बांधकाम व्यावसायिक आहोत हे सांगीतले आणि तरीही इतरांनी त्यांचा कधी दुस्वास केला नाही. उलट डीएसकेंवर वाईट वेळ आल्यानंतर त्यांनी डीएसकेंच्या पाठिशी उभे रहाण्याचेच लोकांना आवाहन केले.

नातेवाईकांचे म्हणाल तर काही नातेवाईकांनी नकळत डीएसकेंच्या काही गुन्ह्यात सामील झाले. परंतु चूक लक्षात येताच डीएसकेंकडून इन्डेम्निटी बॉंड लिहून घेउन ते दूर झाले आणि त्यानंतर डीसकेंच्या स्वच्छ प्रतिमेला घाबरून ते त्यांच्या वा-याकडेही फिरकले नाहीत.

ठेवीदारांनी का तक्रारी दाखल केल्या हे जगजाहीर आहे.

फ्लॅट धारकांचे म्हणाल तरी ज्यांनी ‘ आधी घर नंतर पैसे‘ योजनेत घर नोंदवले आणि ज्यांना घरही मिळाले नाही आणि कबूल केल्याप्रमाणे डीएसकेंनी हफ्ते न भरल्याने ज्यांचे सिबिल रेटींग खराब झाले त्यांने तक्रार केली तर त्यांना दुष्ट कसे म्हणता येईल?

डीएसकेच्या आवाहनाला फ्लॅटधारकांनी ‘हा नंबर जर खरंच डीएसकें चा असेल, तर त्यांनी किंवा हा नंबर ऑपरेट करणाऱ्यानी कृपया दखल घ्यावी, डी एस के सदाफुली चे पझेशन देण्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी.आमचे पैसे अडकलेले आहेत.पझेशन देणे शक्य नसल्यास, कृपया आम्ही भरलेले पैसे (१०%) कृपया परत करावेत.‘ असे उत्तर दिले आहे यावरून विषयाचे गांभीर्य लक्षात यावे.

मग डीएसके या लोकांना दुष्ट का म्हणत आहेत?

५. डीएसके गुंतवणूकदारांना पुढे असेही म्हणतात की, तुमचे पैसे देण्यासाठी प्रॉपर्ट्या विकायला गेलो तर तिथेही हे लोक काड्या करतात. मीडियाच्या मदतीनं माझ्याबद्दल इतकं मत गढूळ करून ठेवलंय की पैसे देण्यासाठी पुढे आलेला फायनान्सरही घाबरून मागे सरतो. मग पैसे येणार तरी कसे?सारखं कोर्टकचेर्‍या, रोज नवीन अफवा, पोलीस चौकश्या या सगळ्यात मी गुंतून राहिलो तर पुढे काम करणार तरी कसं? परिस्थिती सुधारणार तरी कशी?

डीएसके नेहमी आपल्या चूकीचे किंवा गुन्हाचे खापर फोडण्यासाठी कोणत्यातरी कारणाच्या शोधात असतात आधी आर्थिक मंदी नंतर नोटबंदी आणि आता मिडिया. 

खरेतर डीएसकेंची जी अवस्था आज आहे त्याला कारणीभूत ते स्वत: आणि त्यांचे कुटुंबिय आहेत.

माध्यमांमध्ये डीसकेंची चर्चा सुरू झाली ती आत्त्ता अलिकडे दोन चार महिन्यांपूर्वी .त्याआधी काही वर्षांपूर्वीच पडझडीला सुरूवात झाली होती हे त्यांच्या लेखापरिक्षकांनीही मान्य केले आहे. 

ही पडझड झाली कारण डीसकेंनी अक्षरश: शेकडो कोटी रुपये आपले कुटुंबिय आणी त्यांच्या कंपन्यांकडे वळवले हे  कुटुंबियांकडे वळवलेले पैसे परत कधी डीएसकेडीएलकडे आलेच नाहीत.

कुठलाही फायनान्सर माध्यमातील बाबतम्यांवर व्यवहार करत नाहीत. त्यांची आपली स्वत:ची यंत्रणा असते त्यांच्या माहितीच्या आधारे ते निर्णय घेत असतात.

आणि डीएसकेंना मदत करायला कोण पुढे आले नाही अशातील भाग नाही. अगदी ‘ तुम्ही फक्त लढ म्हणा‘, लोकवर्गणी ,’ ब्राम्हण एकटा नाही’ , मराठी उद्योजक या आणि इतर अनेक कारणांनी डीसकेंनी साद घातली आणि  अनेकांनी मदतीचा हात पुढे केला.परंतु डीएसकेंचा एकूण व्यवहार बघीतल्यानंतर त्यांनी माघार घेतली.

डीएसकेंची एकही मालमता कर्जविरहित नाही. आणि जी कर्जं आहेत ती सुद्धा मूळ मालमत्तेच्या किमतीपेक्षा कितीतरी पट अधिक आहेत . 

अशा स्थितीत अशा मालमत्ता घ्यायला कोण पुढे येईल?

अगदी डीएसकेंनी उच्च न्यायालयातही आपली एकही मालमत्ता कर्जविरहीत नाही याची कबूली दिली आहे.

उच्च न्यायालयाने डीएसकेंना २०० कोटी रुपयांच्या कर्जविरहीत मालमत्तेची यादी सादर करायला सांगीतली होती. तशी यादी ते सादर करू शकले नाहीत. जी यादी सादर केली त्या मलमत्तेवर कर्ज तर होतेच परंतू त्यांच्या किमतीही ४ ते ५ पट जास्त फूगवून सांगीतल्या होत्या.

आता डीएसकेंच्या अशाच एका मालमत्तेचे उदाहरण पाहूया.

पुण्याजवळील टाकवे येथे डीएसकेंचे चिरंजीव शिरिष यांनी स्वत:च्या नावावर २०/११/२०१५ रोजी एक ३४ एकर जमीन खरेदी केली . यात शिरिष यांचा पत्ता डीएसके हाउस असा देण्यात आला होता. आता हा पत्ता का देण्यात आला होता याचे वेगळे कारण सांगायची आवश्यकता नाही.

या जमीनीची किमत ३४.३५ कोटी इतकी होती.

ही जमिन खरेदी केल्यानंतर अवघ्या तीन दिवसात शिरिष यांनी डीएसके मोटोव्हील्सला ती भाडेपट्टयाने दिली आणि ते भाडे दरमहा मिळत आहे ते शिरिष कुलकर्णी यांना.

















भाडे ठरले तब्बल ४५ लाख रुपये महिना.अणि दरवर्षी ५% भाडेवाढ.


प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. याच जमिनीतील सुमारे पाच एकर जागेवर नंतर डीएसके मोटर्स प्रा ली साठी १०३.६० कोटी ( एकशे तीन कोटी साठ लाख रुपये ) इतके कर्ज टोयोटा फायनान्शिअल या कंपनीकडून उचलण्यात आले.



आता सांगा अशा प्रकारच्या व्यवहारात हात घालायला कोण पुढे येईल?

डीएसके मोटर्सचे संचालक शिरिष,तन्वी आणि अमित कुलकर्णी आहेत तर  डीएसके मोटोव्हील्सचे संचालक शिरिष कुलकर्णी , वैजयंती मुद्गल आणि अनुराधा पुरंदरे आहेत.

अशा स्थितीत डीएसकेंनी आपल्या अवस्थे साठी इतरांना दोष देणे कितपत योग्य आहे.?

बरे अशा गंभीर स्थितीत डीएसकेंच्या कुटुंबियांचे उद्योग थाबलेत का ? 

डीएसके बेनेलीच्या आणखी एका शोरूमचे बेंगलुरू येथे नुकतेच उद्घाटन झाले.

डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी हा सगळा गदारोळ सुरू असताना म्हणजे अगदी अलीकडे सप्टेंबर मध्ये ग्रामीन दुकान नावाची कंपनी सुरू केली. 

हे सगळ काही पैशाशिवाय होतं? याच्यासाठी लाखो करोडो रुपये येतात कुठून ?

एकीकडे ठेवीदारांचे नातेवाईक मरणासन्न अवस्थेत रुग्णालयात खितपत पडले असले तरी त्यांना काही हजार रुपये सुद्धा द्यायचे नाहीत आणि आपले खर्च मात्र सुखनैव सुरू ठेवायचे या गोष्टी ठेवीदारांच्या लक्षात येत नाहीत असे थोडेच आहे?

काही दिवसांपूर्वी डीसकेंनी नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर साठी तारण ठेवलेली जागा बदलून देण्यासाठी आणि मुदत वाढीसाठी डीबेंचर धारकांकडून पोस्टल मतदान मागवायची नोटीस दिली आहे.

या डीबेंचर धारकांपैकी सुमारे ४ हजार जणांचे पत्ते संकेतस्थळावर दिसून येत नाहीत.

तसेच यात हेमंती दीपक कुलकर्णी या नावाने ५ कोटी १ लाख रुपयांचे  , कुलकर्णी हेमंती दीपक या नावाने ३ कोटी रुपयांचे तर दीपक सखाराम कुलकर्णी यांच्या नावे १ कोटी रुपयांचे डीबेंचर दिसून येतात.

याचा सर्व प्रकाराचा अर्थ योग्य तो लावला जाईलच परंतु अजूनही डीएसकें योग्य आणि खरी ती माहिती  गुंतवणूकदारांसमोर का ठेवत नाहीत याचा उलगडा होत नाही.

आपल्या मालमत्ता कोणत्या आहेत त्यांची आताची किंमत (बाजारभावानुसार डीसकेंच्या मर्जीनुसार नव्हे) काय आहे आणि त्यावर कर्ज किती आहे याची खरी माहिती पुराव्यासह  गुंतवणूक दारांसमोर ठेवली तरी त्यांच्या मनातील संभ्रम दूर होइल.

परंतू डीएसके तसे करतील?

शक्यता शून्य आहे?


Related Stories 














कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा