प्रती ,
मा.श्री . महेश पाठक ,
आयुक्त , पुणे महानगरपालिका ,
पुणे ,
विषय - पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे वाढवण्याच्या तंत्रज्ञानाचे विकसक कोण ?
महोदय,
पुणे शहरातील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य आहे. अर्थात दरवर्षी तसे ते असतेच . दरवर्षी २४ तासात खड्डे दुरुस्त केले जातील असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त संपूर्ण पावसाळाभर पुणेकरांना देत असतात . आपण स्वत:ही अशी आश्वासने यापूर्वी दिली आहेत . १५ सप्टेंबर २०११ रोजी पुण्यातिल एका वर्तमान पत्रात "दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या तुफान पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले होते. ते बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. डांबराची ने-आण करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ती समस्या दूर झाली आहे. आता एका दिवसात शहरातील सर्व खड्डे बुजविलेले असतील. तरीही लोकांनी खड्ड्यांबाबत तक्रार केल्यास २४ तासांत ते बुजविले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी सांगितले.नागरिकांनी तक्रारीसाठी २५५०१०८३ या क्रमांकावर पथ विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पाठक यांनी केले आहे. " अशी बातमी छापून आली होती .दरवरर्षी महापालिका आयुक्त असे आवाहन करीत असतात . यावरून स्पष्ट होते की रस्त्यावर खड्डे पडले असतील त्याची माहिती नागरिकांनी दिली तरच महापालिकेला समजते. परंतु त्यामुळे एकच प्रश्न मनात येतो तो म्हणजे महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी कोणत्या रस्त्याने पालिकेत येतात ? . त्यांना हे खड्डे का दिसत नाहीत ? . असो .
काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका रस्त्यावरून जात असताना काही लोक भरपावसात रस्त्यावरील खड्यातील पाण्यात काहीतरी टाकत असल्याचे दिसले . चौकशी केली असता तो महापालिकेचा ठेकेदार असून खड्डे बुजविण्याचे काम करत असल्याचे समजले . आनंद वाटला , परंतु दुस-या दिवशी त्याच रस्त्यावरून जात असताना तो खड्डा बुजण्याऐवजी मोठा झाल्याचे, त्यातील मिश्रण आजूबाजूला पसरल्याचे आणि आसपास नवीन छोटेमोठे खड्डे पडल्याचे दिसले . नंतर समजले की महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार मिळून या खड्ड्यांच्या माध्यमातून फार मोठे देशकार्य करीत आहेत . जितके खडे जास्त तितकी रोजगारनिर्मिती जास्त . या खड्ड्यांमुळे ठेकेदार, बिगारी , वाहन दुरुस्ती करणारे, पेट्रोल पंपवाले , अशा अनेकांचा रोजगार वाढता असतो . अशी रोजगार निर्मिती व्हावी म्हणून म्हणे या लोकांनी नवीन तंत्रज्ञानाचाही शोध लावला आहे. या तंत्रज्ञानानुसार आता तर रस्त्यात खड्डे पडण्यासाठी पुण्यात पाउस पडण्याचीही आवश्यकता नाही . महाराष्ट्रात कोठेही पाउस पडला तरी खड्डे मात्र पुण्यातील रस्त्यावर पडतील , इतके ते तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. याच सद्हेतूने या लोकांनी पुण्यातील अनेक दशके सुस्थितीत असलेला जंगली महाराज रस्ता विद्रूप करण्याचा प्रयत्न केला . अद्याप तरी त्यांना म्हणावे असे यश मिळालेले नाही , परतू लवकरच ,मिळेल त्यासाठी जोरदार प्रयत्न हे लोक करताहेत .
खरेतर पुणे महापालिकेत आता पारदर्शकतेला फारसे महत्व उरलेली नाही आणि वरील देशकार्याचे मोल पैशात करता येणे शक्य नाही . तरीही या देशकार्यासाठी नेमका किती खर्च गेल्या काही वर्षात झाला याबाबत सर्वांना उत्सुकता आहेच, म्हणून
१) पुणे शहरात गेल्या पाच वर्षात किती आणि कोणते रस्ते विकसित करण्यात आले?
२) त्यावर किती खर्च करण्यात आला ? .
३) त्या रस्त्याचे काम कोणी केले ?
४) ठेकेदाराशी केलेल्या करारातील अटी काय होत्या ?
५) त्यांचा हमी कालावधी (guaranty period) किती होता ?
६) इंडियन रोड कॉंग्रेसच्या संकेतांनुसार अशा रस्त्यांचा हमी कालावधी किती असणे आवश्यक होते ?
७) या रस्त्यांवर खड्डे दुरुस्तीसाठी किती खर्च करण्यात आला?
८) हमी कालावधीत खड्डे पडल्याने संबधित ठेकेदारांवर काय कारवाई करण्यात आली?
इत्यादी माहिती प्रत्येक रस्त्याची आणि प्रत्येक वर्षाची स्वतंत्रपणे जाहीर करावी हि विनंती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा