सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

किटकजन्य आजारांच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध , समान न्यायाची अपेक्षा

प्रती,
मा.श्री. महेश पाठक , 
आयुक्त , पुणे महानगर पालिका, 
पुणे. 

विषय - किटकजन्य आजारांच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध , समान न्यायाची अपेक्षा .....

महोदय , 

पुणे महानगर पालिकेने नुकतीच घराच्या परिसरात जर डास आढळले  तर थेट  नागरिकांवर  खटला  दाखल करण्यास सुरूवात केली आहे आणि त्यानुसार  दोन पुणेकरांवर  खटले दाखलही करण्यात आले आहेत.डासांमूळे होणा-या डेंग्यू, चिकुन गुनिया, हिवतापांसार‘या आजारांचं गांभीर्य ओळखून महापालिकेची आरोग्य यंत्रणा डास निर्मूलनाच्या कामाला लागली आहे . मात्र ही जबाबदारी फक्त महापालिकेची   नसून त्यात नागरिकांचाही  सहभाग आवश्यक असल्याने सदर कारवाई करण्यात आली . शहरात 30 हजार ठिकाणं डासांची उत्पत्तीस्थळं आढळून आली आहेत. त्यापैकी 700 नागरिकांना ही उत्पत्तीस्थळं नष्ट करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

नागरिकांनाही आपल्या जबाबदारीची जाणिव  व्हावी या उद्देशाने सुरू केलेला हा उपक‘म निश्‍चितच स्तुत्य आहे .मात्र नागरिकांबरोबरच सार्वजनिक प्राधिकरणांच्या  अधिका-यांनाही  आपल्या जबाबदारीची जाणिव असायला हवी आणि ते जर अशी जबाबदारी पार पाडत नसतील तर त्यांच्यावरही समान कारवाई व्हायला हवी . पालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागाने 8 मार्च 2013 रोजी शहरातील  सर्व शासकीय कार्यालयांना पत्र पाठवून परिसरात किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव  होउ नये याची दक्षता घेण्यासाठी एका जबाबदार व्यक्तीची नेमणूक करण्यास  सांगीतले होते. सदर पत्रे पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळासह सर्व शैक्षणिक संस्था , पालिकेचे विभाग आणि इतर शासकीय आस्थापना यांना पाठविण्यात आली होती . परंतु या पत्राला अगदी नगण्य असा प्रतिसाद मिळाला. 

शहरातील परिसर आणि शहराचे आरोग्य स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांवर कारवाई करण्यास कोणाचीही हरकत नाही.  मात्र ज्या  शासकीय आस्थापना पालिकेच्या आवाहनाला साधा प्रतिसादसुद्धा देत नाहीत त्यांच्यावर सर्वात अगोदर कारवाई करणे आवश्यक आहे . आणि त्याहीआधि पालिकेने आपले कार्यालय सर्वाधिक स्वच्छ ठेउन स्वच्छतेचा वस्तूपाठ इतरांना घालून दिल्यास ते आणखी संयुक्तीक ठरेल . सध्या निदान पालिकेची मु‘ख्य इमारत किती स्वच्छ आहे आणि ती स्वच्छ ठेवण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते ती व्यवस्थित पार पाडत आहेत का याची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी ही विनंती. 

कळावे

आपला 
विजय कुंभार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा