Chief Minister लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Chief Minister लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १४ जून, २०१८

राज्यपालांनी मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीच्या बंद लिफाफ्यावर सही केली ?

राज्याच्या सर्वोच्च कार्यालयातच जर कारभाराच्या बाबतीत आणि पारदर्शकतेच्या बाबतीत सावळा गोंधळ असेल तर सामान्य जनतेने आशेने बघायचे कुणाकडे?

राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्तीच्या बाबतीत आणि त्याची माहिती माहिती अधिकारांतर्गत देण्याबाबत जी  काही उलटसुलट माहिती दिली जात आहे त्यातून या पदाच्या नियुक्तीबाबतचे मळभ दूर होण्याऐवजी ते अधिक गडद होत चालले आहे.

माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीवरून मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीच्या बंद लिफाफ्यावर राज्यपालांनी  सही केली असा अर्थ निघतो.

या विषयाकडे नंतर बघू आधी इतर माहिती काय दिली आहे ते पाहू.

५ जून २०१८ रोजी विक्रम गायकवाड यांना दिलेल्या उत्तरात सामान्य प्रशासन विभागाच्या जन माहिती अधिकारी श्वे. प्र .खडे उत्तर दिले होते की राज्य मुख्य माहिती आयुक्त पदासाठी आलेल्या अर्जांची माहिती कार्यासनात उपलब्ध नाही .



त्याच जन माहिती अधिका-यांनी १० एप्रिल २०१८ रोजी श्रीकांत रेडेकर यांना दिलेल्या उत्तरात मात्र अगदी स्पष्टपणे सदर पदासाठी ६ अर्ज आल्याचे आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीची बैठक १३/१२/२०१७ रोजी पार पडल्याचे म्हटले आहे.



जर कार्यासनाकडे किती आणि कुणाचे अर्ज आले हे १० एप्रिलला माहित होते तर मग कार्यासनातून ते अर्ज गायब कुठे झाले ?. त्या अर्जांच्या प्रती व सर्व अर्जदारांच्या गुणवत्ता नोंदीची माहिती ५ जून २०१८ रोजी  विक्रम गायकवाड यांना दिलेल्या उत्तरात का देण्यात आली नाही ?

बरे हि सगळी माहिती एकाच जन माहिती आधिका-यांनी दिली आहे हे आणखी विशेष.

आता चूकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याबद्दल तक्रार करायची झाली तर अर्जदारांनी ती करायची कुणाकडे ?

ज्या मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीबद्दल आक्षेप त्यांच्याकडेच ?

माहिती आयुक्त पदासाठी आलेल्या अर्जामधून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीद्वारे नियुक्ती करण्यात येते तसेच नियुक्तीचे सर्वाधिकार समितीकडे असतात.

राज्य मुख्य माहिती आयुक्त पदी नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीची बैठक दि १३.१२.२०१७ रोजी पार पडली .

या समितीने किती जणांच्या अर्जाचा विचार केला याची माहिती दिलेली नसली तरी विक्रम गायकवाड यांना दिलेल्या उत्तरात खाडाखोड केलेली असली तरी त्याकडे बारकाईने पाहिल्यास ५ जणांच्या अर्जाचा विचार केला असावा असे वाटते?

आणि असे असेल तर त्या अर्जदारांच्या नोंदवलेल्या गुणवत्तेची माहिती गायकवाड यांना का देण्यात आली नाही.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीद्वारे नोंदवलेली गुणवत्ता नागरिकांना माहिती अधिकारांतर्गत उपलब्ध असली पाहिजे असे म्हटले आहे.

We further direct that the Committees under Sections 12(3) and 15(3) of the Act while making recommendations to the President or to the Governor, as the case may be, for appointment of Chief Information Commissioner and Information Commissioners must mention against the name of each candidate recommended, the facts to indicate his eminence in public life, his knowledge in the particular field and his experience in the particular field and these facts must be accessible to the citizens as part of their right to information under the Act after the appointment is made.

त्रिसदस्यीय समितीने निर्णय घेतल्यानंतर तत्कालिन मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या सहिने ती शिफारस राज्यपालांकडे पाठवण्यात आली.

मात्र ही शिफारस बंद लखोट्यात पाठवण्यात आल्याचे माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीत म्हटले आहे आणि त्याच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवावा अशी शासनाची अपेक्षा आहे .

त्रिसदस्यीय समितीच्या शिफारशीवर राज्यपालांनी ३० डिसेंबर २०१७ रोजी सही केली.

राज्यपालांच्या सहीनंतर  ती सर्व कागदपत्रे परत शासनाकडे आली तरी कुणाची नियुक्ती मुख्य माहिती आयुक्तपदी केली आहे हे मुख्य सचिवांसह कुणालाही समजले नाही ?

इतकी गोपनीयता?

आता राज्यपालांनीही बंद लखोट्यावर सही केली असे शासनाला म्हणायचे आहे का ?



त्रिसदस्यीय समितीमध्ये मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे होते .

या तिघांनाही कायदा व सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय याची कल्पना प्रशासनाने दिली होती कि नव्हती ?

या तिघापैक़ी सुमित मलिक यांचे नांव लिहून लखोटा सिलबंद केला कुणी?

राज्यपालांच्या सहीनंतर प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा मराठी आणि इंग्रजी मसूदा १४ डिसेंबर २०१७ रोजीच पाठवण्यात आला होता.

ती अधिसूचना राज्यपालांच्या सहीनंतर लगेचच का प्रसिद्ध करण्यात आली नाही ? चार महिने फाईल दाबून कुणी ठेवली आणि का ?

Related Stories


Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
                     
RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com



बुधवार, ५ ऑगस्ट, २०१५

राज्य सरकार विरोधकांच्या घोटाळ्यांना पाठिशी का घालत आहे ?

सध्या महाराष्ट्रात चिक्की घोटाळा गाजतो आहे. सदर घोटाळा ‘ चिक्की घोटाळा ‘ या नावाने कुप्रसिद्ध असला तरी त्यात फक्त चिक्कीचा समावेश आहे असे नाही. त्यात आयुर्वेदिक बिस्कीटे, पुस्तके, ताटे, वॉटर फिल्टर , प्लस्टिक चटया, सतरंज्या, पुस्तके, प्रिंटिंग ,औषधे अशा अनेक प्रकारच्या घोटाळ्यांचा समावेश आहे. अर्थात यातील सर्वात मोठी खरेदी हि चिक्कीची असल्याने त्याला 'चिक्की घोटाळा‘ म्हणून ओळखले जाणे स्वाभाविक आहे.


महाराष्ट्रातील चिक्की घोटाळ्याबाबत त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत नुकतेच दिले. चिक्कीसह इतरही काही घोटाळ्यांच्या बाबतीत तत्कालीन विरोधी पक्षांच्या म्हणजे विद्यमान सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांच्या तक्रारीवरून पूर्वीच्या शासनाने काही चौकशी समित्या नेमल्या होत्या.त्या समित्यांनी काही केले नाही.पूर्वीच्या शासनाने त्यांच्या काळातील घोटाळ्यांची चौकशी केली नाही ही बाब समर्थनीय नसली तरी समजण्यासारखी आहे. परंतु दुर्दैवाने आताच्या सरकारनेही त्याबाबतीत काही ठोस पावले उचलण्याऐवजी अशा समित्यांना मुदतवाढी देण्यातच धन्यता मानली आहे.
२०१३ साली सालच्या चिक्की प्रकरणाबरोबरच२०१४ साली आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळा व वसतीगृहांसाठी सोलर वॉटर हीटर व बायोमेट्रिक यंत्रणा उभारण्यासंदर्भात झालेल्या घोटाळ्यांच्या चौकशी साठी समिती नेमली होती. सुमारे ३७.५० कोटी रुपयांच्या या खरेदीतील हीटर्स आश्रमशांळांपर्यंत पोहोचलेच नाही. तत्कालीन विरोधी पक्षाच्या सदस्यांनी  याबाबत तक्रारी केल्यानंतर सर्वप्रथम २६ एप्रिल  २०१४ रोजी एकसदस्यीय चौकशी समिती नेमून तीला अहवाल देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती.नेहमी प्रमाणे
चौकशी समितीला चौकशी करण्यासाठी वेळ मिळाला 
नाही. त्यानंतर ऑगस्ट २०१४ मध्ये  या समितीला सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली. अर्थात या कालावधीत देखील समितीला चौकशी करायला वेळ मिळाला नाही.तो मिळणार नव्हताच.कारण शासकीय अधिकारी मंत्र्यांना आणि अधिका-यांना त्यांच्या घोटाळ्यांन- गैरव्यवहारांना नेहमीच पाठिशी घालत असतात.शासकीय अधिकारी आपल्या सहका-यांना वाचवण्यासाठी कोणत्या थराला जातात यावर मुंबई उच्च न्यायालयाने विवेक कुलकर्णी विरूद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात फार गंभीर ताशेरे ओढले आहेत.


त्यानंतर भाजपा सेनेचे सरकार आले.त्यांच्याच सहका-यांच्या  आरोपांवरून चौकशी समित्या नेमल्या गेल्याने या सरकारच्या काळात तरी सदर समित्यांचे अहवाल येतील, कोणाला तरी दोषी धरले जाईल,शिक्षा होईल आणि परिणामी असे घोटाळे पुन्हा होणार नाहीत असे वाटले होते परंतु तसे घडले नाही. उलट या शासनाने समितीला फेब्रुवारी २०१५ मध्ये सहामहिन्यांची आणखी मुदतवाढ दिली. या मुदतवाढीनंतर १४ जुलै २०१५ पर्यंत या समितीने अहवाल देणे अपेक्षीत होते परंतु अद्याप तरी असा अहवाल दिला गेल्याचे ऐकिवात नाही.

अशा समित्यांवर काही जबादारी असते की नाही? की त्या  केवळ सामान्य नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी विरोधक आणि सत्ताधा-यांच्या संमतीने नेमल्या जातात. असा संशय घ्यायला वाव आहे कारण मागील सरकारने त्याबाबतीत काही केले नाही आणि आताचे सरकारही त्यावर मूग गीळून गप्प आहे.

चिक्की प्रकरणातील चौकशी समितीने अहवाल दिलाच नाही. तरीही भाजपा शासनाने ज्या ठेकेदाराची चौकशी चालू होती त्याच ठेकेदाराला चिक्कीचे कंत्राट दिले . वॉटर हीटर घोटाळ्यातील समितीने १५ महिन्यांनतरही अहवाल दिला नाही. तरीही या समित्यांवर कोणतीही कारवाई केली गेली नाही. हा काय प्रकार आहे ?.सर्व नियम मोडून एका दिवसात करोडोंची कंत्राटे मंजूर केली जातात. मात्र त्याच कंत्रांटामधील घोटाळ्यांच्या चौकशा वर्षानुवर्षे पुर्ण का होत नाहीत ?. आणि त्याविरोधात सत्ताधारी किंवा विरोधकही चकार शब्द का काढत नाहीत ?.हा प्रकार अजब आहे.

चिक्की घोटाळ्यामूळे  आता हे  सिद्ध झाले आहे की  महिला बाल विकास खात्यातील सर्व कंत्राटदारांचा सूत्रधार एकच असावा. अन्यथा चिक़्कीच्या पाकिटावरील फोन नंबर आणि वॉटर  फिल्टरच्या पुरवठादाराचा नंबर एकच कसा निघाला असता. 

या सूत्रधाराने गेली अनेक वर्षे अधिका-यांच्या मदतीने या खात्यात धुमाकूळ घातल्याचे दिसते.पैशाच्या जोरावर हा ठेकेदार मंत्र्यांनाही खिशात घालत असल्याने सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी अशा घोटाळ्यांची चौकशी होत नाही.भाजप - सेना सरकार याला अपवाद असेल असे वाटले होते .परंतु तसे झाले नाही.

आपल्या शासनाच्या चुकांवर पांघरून घालण्याच्या प्रयत्नात हे सरकार मागील सरकारातील मंत्र्यांच्या अपराधांवरही पांघरून घालत आहे .शासकीय अधिका-यांच्या चौकशी समित्या नेमल्याने त्यातून काहीही निष्पन्न होत नाही हा इतिहास आहे.चौकशी समित्या नेमण्याच्या फार्सची सुरूवात जरी आधीच्या सरकारांनी केली असली तरी भजपा - सेना सरकारही त्या मळलेल्या वाटेने चालत आहे ही दुर्दैवाची बाब आहे. त्याचप्रमाणे त्यांची ही कृती विरोधकांनी त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी केलेल्या प्रमादांवर पाघरून घालण्यासाठी केलेली मदत ठरत आहे

Related stories