गुरुवार, ६ जुलै, २०१७

टेंपल रोज फसवणूक प्रकरण: ६८ बँकखाती ग़ोठवली, ४४० एकर जमीन,एक चारचाकी,१३ मोबाईल फोन्स, ६.५ लाख रुपये , दलालांची कार्यालये आणि घरांची अनामत जप्त

टेंपल रोज रिअल इस्टेट फसवणूक प्रकरणाची व्याप्ती आता वाढत असून आतापर्यंत पुण्यात २१० तर मुंबईत सुमारे ३९० इतक्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत.सदर प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आरोपींकडून ६८ बँक खाती, ४४० एकर जमीन,एक चारचाकी, १३ मोबाईल फोन्स, ६.५ लाख रुपये रोख तसेच कंपनीच्या कार्यालये आणि घरांसाठी दिलेली अनामत जप्त केली आहे.तर मुंबई पोलिसांनीही आरोपींची ५४ बँक खाती गोठवली आहेत.या प्रकरणातील प्रमूख आरोपी देविदास सजनानी आणि एक दलाल रमेश अगीचा हे बराच काळ पुणे पोलिसांच्या कोठडीत व्यतीत केल्यानंतर आता न्यायालयीन कोठडीत आराम करीत आहेत.पुण्यात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक राजेश पुराणिक तर मुंबईत पोलिस निरिक्षक महेश काळे या गुन्ह्यांचा तपास करत आहेत .




दरम्यान या प्रकरणातील इतर आरोपी केशव नारायण ईड्ड्या, मार्कस योहान थोरात, दीपा देविदास  सजनांनी, वनिता देविदास सजनांनी, सुनील दादा गाजी, धर्मेश नरेंद्र जोशी ,शर्मिला धर्मेश जोशी, कन्हैयालाल नारायणदास साधवानी, अशोक तोलाराम पमनानी,सपना रमेश अघीचा, स्वेता रमेश  अघीचा आणि श्रीकांत परमेश्वर जैस्वाल यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. 

सदर प्रकरणाची  व्याप्ती प्रचंड आहे. मुंबई पोलिसांनी सदर प्रकरणातील गुंतवणुकीची रक्क्म २१७ कोटी रुपये इतकी असल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात ही रक्कम त्यापेक्षा कैक पटींनी जास्त आहे.एकट्या पुण्यातील पिंगोरी येथील ५२०० प्लॉट्समध्ये ४००० गुंतवणुकदारांनी पैसे गुंतवले आहेत. राज्यात असे कंपनीचे ४२ प्रकल्प आहेत. त्यातील हजारो प्लॉट्समध्ये किती गुंतवणुकदारांनी किती पैसा गुंतवला असेल याचा अंदाज करता येणे कठीण आहे.कंपनीच्या दलालांची संख्याच सुमारे १३०० पेक्षा जास्त आहे. त्यातील कत्येकांना एक कोटीपेक्षा जास्त रक्कम केवळ कमीशनपोटी मिळालेली आहे. यावरूनच यातील घोटाळ्याच्या रकमेचा अंदाज यावा . 

टेंपल रोज घोटाळा प्रचंड मोठा असलातरी या प्रकरणातील राजकीय पक्षांची, नेत्यांची आणि प्रशासनाचीही शांतता चकीत करणारी आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींचे रहाणीमान अत्यंत आलीशान आहे. शेतीशी त्यांचा दुरान्वयानेही संबध येत नाही.असे असले तरी त्यांनी महाराष्ट्रात पुणे, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड,सातारा, उस्मानाबाद यासह अनेक ठिकाणी तसेच केरळ, तेलंगणा येथेही शेकडो एकर शेती खरेदी केली. त्यासाठी स्वत: शेतकरी असल्याचे दाखले मिळवले, कमाल शेतजमीन धारणा कायदा अस्तित्वात असताना त्याचे उल्लंघन करून एकेकाच्या नावावर शेकडो एकर शेती घेतली, तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन केले. इतके सगळे झाले तरी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. 

छोट्या छोट्या गावात शेकडो एकर शेतीचा व्यवहार होत असताना त्याची कुणकुण राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागली नाही असे समजणे फारच भाबडेपणाचे ठरेल. अगदी बारामती जिथे शेतेजमिनीच्या एका इंचाचा व्यवहार झाला तरी मोठा बोभाटा होतो. त्या बारामती जवळील कारखेल येथे या घोटाळ्यातील आरोपींनी शेती खरेदी केली तरी कुणाला कुणकुण लागली नाही. किंवा लागली असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले गेले असेच म्हणावे लागेल. अर्थात प्रशासन किंवा राजकीय पक्षांचे नेते -कार्यकर्ते अशा बाबींकडे दुर्लक्ष का करतात हे वगळे सांगायची गरज नाही.

सदर प्रकरणात सजनानी याने गुंतवणुकदारांचे पैसे परत देण्यासाठी रामगिरी शुगर्सची ७७ एकर जागा, दादर येथील कार्यालय, शहापूर येथील रिसॉर्ट, पिंगोरी येथील २०९ एकर व मालाड (शहापूर) येथील जमिनीचा व्यवहार करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र या मालमत्तेची किंमत ७१ कोटी रुपये म्हणजे खूपच फुगवून दाखवली आहे. त्यातही या मालमत्तेवर ३३ कोटी इतके कर्ज काढले आहे. त्यातील एनकेजीएसबी बँकेचे आणि इंडीया इन्फोलाईनचे सुमारे १६ कोटी रुपये इतके थकीत आहेत तर श्रेम इन्व्हेस्टमेंट प्रा.ली चा बोजा रामगीरी शुगर्स व दादर, शहापुर येथील मालमत्तेवर असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

सजनानी याने कंपनींच्या काही संचालकांच्या नावे जमीन घेतली त्याचप्रमाणे दलाल सुनील गाजी, जावेद सय्यद, सुर्यकांत खटके, व जालींदर वाघमारे  यांनीही जमीनी खरेदी केल्या असून . जावेद सय्यद व वाघमारे यांनी सजनानी यांच्या सांगण्यावरून जमिनी घेतल्या असल्याचे तसेच सजनानी आणि मंडळी यांनी अनेक कंपन्या स्थापन केल्या असून अनेक वित्तीय संस्थांकडून मोठया प्रमाणावर कर्ज घेतले असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

सदर प्रकरणात गुंतवणुकदारांच्या हिताचे संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला असल्याने गुंतवणुकदारांना काही रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी त्यांनी तक्रारी दाखल करणे आवश्यक आहे . सजनानी आणि इतर आरोपी काहीही म्हणत असले तरी त्यांच्याकडून गुंतवणुकदारांचे पैसे कधीही परत मिळणार नाहीत कारण या मंडळींनी कधीही कोणताही व्यवसाय केलाच नाही. गुंतवणुकादारांना आमिष दाखवण्यापुरते काहीतरी उभे करायचे. दलालांना मोठी दलाली द्यायची, जुन्या गुंतवणुकदारांना वा-यावर सोडायचे आणि रोज नव्या गुंतवणुकदारांना एवढाच उद्योग त्यांनी केला. आता राज्यातील सर्व गुंतवणुकदार तक्रार करायला पुढे येणार का हाच एक मोठा प्रश्न आहे.अणि ते जर पुढे आले नाहीत तर असे गुन्हेगार पुन्हा पुन्हा नवे गुन्हे करायला पुढे सरसावणार यात शका नाही.

Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis

RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     – kvijay14@gmail.com

1 टिप्पणी:

  1. महाराष्ट्र मध्ये घोटाळ्यांची काही कमी नाही बरं का . एक ६ ते ७ वर्षा खाली मला देखील ह्या रोज टेम्पल मध्ये गुंतवणुकीचे ऑफर आले होते ते मी फेटाळून लावले होते म्हणून आज माझे ते वेळ चांगले होते म्हणायचे ................असो गुंतवणूक दारांना त्यांचे पैसे कोर्टाकडून तरी परत मिळावे हीच सदीच्छा.........

    उत्तर द्याहटवा