संतवाडी , पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालिक्यातील छोटेसे गाव. जेमतेम ३२५ उंबरा.याच गावातील डोंगरावरती विसावा घेत असताना समोर वर्तुळाकार अशी निसर्गसंपन्न भुमी पाहून ज्ञानेश्वर महाराजांनी या भागाचे आळे असे नामकरण केले असे म्हणतात. याच गावात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याकडून वेद वदवून घेतले त्या गेनोबा रेड्याची समाधी आहे.असा इतिहास असला तरी मागील काही वर्षांपासून गावाला भ्रष्टाचाराने ग्रासले आहे. गावाचे उत्पन्न अत्यल्प असले तरी शासनाकडून विविध विकासकामासाठी येणा-या निधिवर डल्ला मारण्याचे तंत्र काही ठेकेदारांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आत्मसात केले आहे.या बेकायदा कामांना विरोध केला म्हणून सर्व सदस्यांनी मिळून एका महिला सरपंचाविरूद्ध अविश्वास ठराव मज़ूर करून त्यांना पदावरून दूर केले.सामुहिक भ्रष्टाचाराचे हे एक नमूनेदार उदाहरण आहे.
संतवाडी मध्ये लाखो रूपयांची बेकायदा कामे झाली असून अनेक कामे आज अस्तित्वात देखील नाहीत.या कामांच्या निविदा काढणे लांब राहिले ज्या ठेकेदाराने हि कामे केली त्याच्याकडे साधे शॉप ॲक्ट लायसन्ससुद्धा नाही. तरीसुद्धा या ठेकेदाराच्या नावाने आतापर्यंत लाखो रुपयांची बिले निघाली आहेत.ऑगस्ट २०१५ मध्ये स्मिता पाडेकर सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी बेकायदा कामांना तसेच जुन्या बेकायदा कामांची बिले काढायला विरोध केला. साहजिकच बोगस ठेकेदार, ग्रामपंचायत सदस्य व शासकीय अधिकारी या सर्वांनी त्यांच्यावर दबाव आणला. परंतु दबावाला बळी न पडल्याने अखेर इतर सर्व सदस्यांनी एकमताने त्यांच्याविरूद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर केला.
स्मिता पाडेकर यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानंतर त्यांनी केलेले अपिल फेटाळले गेले. मात्र या ग्रामपंचायतीमध्ये ३ सदस्यांच्या विरूध जातपडताळणीचे दाखले न दिल्याबद्दलच्या तसेच निवडणूक खर्चाचा तपशील न दिल्याबद्दलच्या तक्रारी प्रलंबित आहेत मात्र त्यावर निर्णय घ्यायला अद्याप कुणाला वेळ मिळालेला नाही.आता स्मिता पाडेकर यांच्यानंतर सरंपच पदी अपात्रतेची टांगती तलवार असलेल्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे.ती निवड झाली की त्या ठेकेदाराची बिले निघण्याचा मार्ग मोकळा होणार हे नक्की.
संतवाडी गावाला भ्रष्टाचाराचाही इतिहास आहे.२००८ साली संतवाडी गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला.त्यासाठी जानेवारी २००७ मध्येच गाव हगणदारी मुक्त झाल्याचे भासवण्यात आले.तसा ठरावही ग्रामपंचायतीमध्ये मंजूर करण्यात आला. मग खालपासून वरपर्यंत सर्वांनी कोंबडे उठवले आणि गावाला निर्मलग्राम पुरस्कार मिळाला.परंतु आजही गावात अनेक घरांमध्ये शौचालय नाही.हे गाव फक्त निर्मलग्रामच नाही तर कुपोषण मुक्त आणि तंटामुक्त गावही आहे.विरोधाभास एवढाच आहे की गावातील तंटे अगदी जिल्हाधिका-यांपर्यंत पोहोचले आहेत.
गावातील ठेकेदार आणी त्याचे काही ग्रामपंचायत सदस्य मित्र मंडळी भलतीच देवभोळी आहेत. इतकी कि रोज रात्री तीर्थ घेतल्याशिवाय झोप येत नाही. तीर्थप्राशनासाठी त्यांची परमिट रूममध्ये प्रवचने चालतात. या प्रवचनातील काही भाग ऐकले की इतरांची कोणताही नशापाणी न करता मती गुंग होउ शकते. या प्रवचनांमधून कोणत्या कामासाठी किती पैसे आले? प्रत्यक्षात कामावर किती खर्च झाले आणि खिशात किती घातले? किती बंधारे मंजूर झाले त्यातील किती प्रत्यक्ष बांधले आणि किता कागदावर बांधले? काही ठिकाणी सिमेंट ऐवजी दगड कसे वापरले ? वैयक्तिक गरजेसाठी ग्रामपंचायतीतून कुणी आणि कसे पैसे काढले ? इत्यादी बाबी सहज कळतात.
अविश्वास ठराव मंजूर होइपर्यंत स्मिता पाडेकर या दोन वर्षे सरपंच होत्या. या दरम्यान त्यांना ग्रामपंचायतीच्या कारभारात अनेक दोष आढळले त्यांनी त्याच्या तक्रारीही केल्या . परंतू ग्रामपंचायतीत केलेल्या गैरकारभाराच्या पैशातून सर्व स्तरावरील सर्वांची तोंडे बंद करण्याची त्याची क्षमता असल्याने अद्याप कुणावरही कोणतीही कारवाई झालेली नाही.पाडेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या काही तक्रारी खालील प्रमाणे.
1. ग्रा.पं.संतवाडी ने आजपर्यंत केलेल्या विकास कामांचे टेंडर नाही.
2. ग्रामपंचायतीमार्फत ठेकेदाराची पात्रता तपासणी झालेली नाही. त्यामुळे निविदा काढणेकामी योग्य ती स्पर्धा झालेली नाही.
3. ग्रामपंचायत व ठेकेदार यांमध्ये करार नाही. किंवा करारपत्र उपलब्ध नाही.
4. ग्रा.पं.संतवाडी ने ठेकेदार म्हणून धनादेश काढलेल्या व्यक्तीचा बांधकाम लायसन्स तपशील उपलब्ध नाही.
5. ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी मिळून गावाची दिशाभूल करून नित्कृष्ट दर्जाची कामे केली आहेत.
6. ग्रा.पं.संतवाडी च्या कोणत्याही मासिक सभा व ग्रामसभेत प्रोसीडींग मध्ये काम करणा-या ठेकेदाराचा उल्लेख नाही.
7. ग्रामपंचायत पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांनी संगनमताने बोगस ठेकेदार (समृध्दी एंटरप्रायजेस्) या नावाने धनादेश दिले आहेत.
8. ग्रा.पं.संतवाडी कामासाठी दाखविली जाणारी कोटेशन बिले बोगस आहेत.
9. ग्रा.पं.संतवाडी ने कामाच्या कोटेशनसाठी दाखविणा-या दुकानात कोटेशन मधील उल्लेख केलेल्या वस्तुंची विक्री करत नाही.उदा.खडी,वाळू,डबर,फर्निचर इ.
10. ग्रा.पं.संतवाडी ने ज्या बिलांचे धनादेश दिले आहेत त्या बिलांवर व्हॅट नंबर, टॅक्स नंबर नाहीत.
11. ग्रामपंचायतीला मटेरिअल पुरविण्यासाठी (उदा.स्टील, खडी, वाळू, सिमेंट इ.) इतर ठेकेदारांच्या निविदा तपशील उपलब्ध नाहीत किंवा असल्यास बोगस आहेत.
12. ग्रा.पं.संतवाडी ने केलेल्या कामांपैकी एकाच बांधकाम इमारतीवर दोन नावे व्यायामशाळा व सामाजिक सभागृह मात्र ग्रामपंचायत 8 अ रजिस्टरला सदर एकाही इमारतीची नोंद नाही.
13. ग्रा.पं.संतवाडी ने केलेल्या जि.प.शाळा दुरूस्ती ही इमारत पुर्ण नविन केलेली असून पाया मात्र जुनाच व निकृष्ट दर्जाचा ठवेलेला आहे.
संतवाडी हे आपल्या देशात भ्रष्टाचार अगदी तळागाळापर्यंत रुजलाय याचे एक उदाहरण आहे. देशातील भ्रष्टाचाराचे जे आकडे रोज आपल्या डोळ्यावर आदळतात त्या तुलनेत या रकमा कमी वाटतील, परंतु देशातील लाखो खेड्यांमध्ये असे प्रकार चालले आहेत याचा विचार केला तर ही रक्कम किती मोठी असेल याचा अंदाज येतो.त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे स्मिता पाडेकर यांच्यासारखी काही मंडळी भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवायला एकाकी लढा द्यायला तयार आहेत. गरज आहे ती समाजाने त्यांच्या पाठीशी उभे रहाण्याची.
To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
RTI KATTA
RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.
Vijay Kumbhar
RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199
Website – http://vijaykumbhar.com
http://surajya.org/
Email – kvijay14@gmail.com
Facebook - https://www.facebook.com/kvijay14
Twitter - https://twitter.com/Vijaykumbhar62
YouTube - https://www.youtube.com/user/kvijay14
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा