कोणत्याही निवडणूका आल्या की आपल्या देशात अण्णू गोगट्यांचे पेव फुटते.( अण्णू गोगट्या होणे म्हणजे निवडणूकीत 'पडणे' हा पु ल देशपांडेच्या अंतूने मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे).हे गोगटे नेहमी आपला अण्णू होण्याचे खापर मतदारांच्या माथ्यावर फोडत असतात.म्हणजे सामान्य मध्यमवर्गीय मतदानाला बाहेर पडत नाही , मतदानाच्या दिवशी तो सिनेमाला , खेळायला , मजा करायला बाहेर पडतो म्हणून आमच्यासारखे निवडून येत नाहीत वगैरे वगैरे, ते काही अंशी खरेही आहे. आता आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील यशाच्या पार्शभूमीवर आता अनेक अण्णू गोगट्यांना आपण लोकसभेवर – विधानसभेवर जाणार असल्याची स्वप्ने पडू लागतील.तशी स्वप्ने त्यांनी पहाण्यात कोणाची काही हरकतही नसावी , परंतु या लोकांनी दोन निवडुकांच्या दरम्यान आपण सामान्य माणसासाठी काय केले हे ही जाहिरपणे सांगीतले पाहिजे.
दिल्लीत विधान सभेत आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभेच्या निवडणूकीसाठी तब्बल ८०,००० इच्छूकांचे अर्ज आल्याचे पक्षाचे पदाधिकारी जाहिरपणे सांगतात.ते खरे असेल तर देशाचे भवितव्य नक्की उज्वल आहे असे मानायला हरकत नाही. परंतु त्याचबरोबर आपल्या प्रामाणिकपणाची हवा डोक्यात गेलेले उमेदवार आणि स्वकर्तृत्वापेक्षा पक्षाच्या यशामुळे मिळालेल्या अवास्तव महत्वाने बेभान झालेले स्थानिक नेते यांच्यापासून पक्षाने सावध रहाण्याची गरज आहे.आतातर स्थानिक नेतृत्वाच्या अपरिक्वतेचा फायदा घेउन इतर पक्षातील असंतुष्ट ,‘स्वयंघोषीत प्रामाणिक उमेदवार‘ , अण्णू गोगटे यांच्याबरोबरच इतर पक्षही राजकीय खेळी म्हणून काही उमेदवार आम आदमी पक्षात घुसविण्याचे प्रयत्न करणार यात कोणतीच शंका नाही .या सर्वातून पक्षाने वेळीच मार्ग काढला नाही तर मात्र आम आदमी पक्षाबरोबर सामान्य माणसाने पाहिलेले सुराज्याचे स्वप्न घुळीला मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा