Credai लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Credai लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

कोल्हापुरच्या पुराची कारणे शोधण्यासाठी शासनाने समिती नेमली मात्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे काँग्रेस राष्ट्रवादीवर शरसंधाण !

नुकतेच महाराष्ट्राच्या अनेक भागात पूराने थैमान घातले होते विशेषत: सांगली व कोल्हापुर जिल्हे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले व मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी झाली. पूराच्या कारणांबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी पंचगंगेच्या पूररेषेशी छेडछाड केल्याचा थेट मुख्यंमंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर भिमा व कृष्णा खोऱ्यात सन २०१९ मध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीची कारणे शोधण्यासाठी व भविष्यकालिन  उपाययोजनात्मक अहवाल तयार करण्यासाठी अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.शासनाने पूराची कारणे शोधण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला असला तरी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पूर्वीच्या काँग्रेस राष्ट्रवादी शासनालाच पूरासाठी जबाददार धरले आहे. आलमट्टी धरणाची उंची वाढवल्यामुळेच कोल्हापूरात महाप्रलय झाल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.





२०१९ मध्ये निर्माण झालेली पूरपरिस्थिती खूपच गंभिर होती. या पूरपरिस्थितीचे खापर कधी पंचगंगेच्या पूररेषेशी केल्या गेलेल्या छेडछाडीवर , तर कधी अलमट्टी धरणाच्या उंचीवर, इतर जलसंपदा प्रकल्पावर व राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेवर फोडले गेले. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होउ नये यासाठी पूराची शास्त्रशुद्ध कारणे शोधण्यासाठी सदर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर (MRSAC), भारतीय हवामान विभाग (IMD),भारतीय प्राद्योगिकी संस्था (IIT), महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (MWRRA) जलक्षेत्रातील विश्लेषक अशा तज्ञांचा समावेश आहे. आणि त्यामध्ये १. नंदकुमार वडनेरे, सेवानिवृत्त प्रधान सचिव, जलसंपदा विभाग, अध्यक्ष २. विनय कुलकर्णी, तांत्रिक सदस्य, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण सदस्य,३.संजय घाणेकर, सचिव (प्रकल्प समन्वय) जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई सदस्य, ४.प्रा. रवी भसन्हा, आयआयटी, मुंबई. सदस्य, ५.नित्यानंद रॉय, मुख्य अभियंता, केंद्रीय जल आयोग, नवी दिल्ली सदस्य,६.संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदना उपयोजिता केंद्र, नागपूर सदस्य,७.उप महासंचालक, भारतीय हवामान विभाग, मुंबई सदस्य,८. संचालक, आय.आय.टी.एम्. पुणे सदस्य, ९ प्रदीप पुरंदरे, सदस्य १०. राजेंद्र पवार, सचिव, लाक्षेवि, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई. सदस्य यांचा समावेश आहे.



सन २०१९ च्या पावसाळयात भिमा व कृष्णा खोऱ्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सखोल तांत्रिक अन्वेषण करुन कारणमिमांसा करणे,कर्नाटकातील अलमट्टी व इतर धरणांच्या जलाशयामुळे (Back water effect) महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण होते काय? याचा जलशास्त्रीय अभ्यास करुन स्वयंपष्ट अभिप्राय देणे,भविष्यातत अशी पूरपरिस्थिती भनमाण होऊ नये वा त्याची दाहकता कमी व्हावी, याकरिता सर्वंकष उपाययोजनात्मक ठोस शिफारशी करणे, धोरणात्मक स्वरुपाच्या उपाययोजना समवेतच सूक्ष्म स्तरावरील शिफारशी. उदा. धरणनिहाय सुधारित जलाशय परिचालन आराखडा, नदी विसर्गाची मोजमापी एकात्मिकृत व्यवस्था, पूरप्रवण क्षेत्रातील बांधकामे नियंत्रण, आपत्कालिन कृती आराखडा (Standard Operating Procedure) इत्यादींबाबत सुधारित आराखडे प्रस्तावित करुन तांत्रिक आकडेवारीसह अहवाल व शिफारस करणे. अशी समितीची कार्यकक्षा आहे.


सदर समितीने ३ महिन्यात आपला अहवाल शासनास सादर करायचा असून समितीला योग्य वाटेल अशा केंद्र, राज्य, इतर राज्यातील अधिकाऱ्यांना तसेच इतर कोणत्याही खाजगी क्षेत्रातील व्यक्ती, तज्ञ संस्थांचे प्रतिनिधी यांना आवश्यकतेप्रमाणे विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्याची मुभा देण्यात आली आहे.



नुकत्याच आलेल्या कोल्हापूर सांगलीच्या पुरात ५८ नागरिकांचा आणि हजारो प्राण्यांचा मृत्यू झाला. मालमत्तेचीही प्रचंड हानी झाली. परंतु; या आणि आधीच्या पुरानेही आपण काही शिकलो का ? राजकारण्यांना नागरिकांच्या हितापेक्षा बांधकाम व्यावसायिकांचे हित जास्त महत्वाचे का वाटते? अशासारखे अनेक प्रश्न निर्माण करणा-या घटना कोल्हापूरकरांच्या बाबतीत घडल्या आहेत. कितीही मोठा पूर आला तरी चालेल, नागरिक मेले तरी चालतील परंतु बांधकाम व्यावसायिकांचे हित जपलेच पाहिजे अशी भूमिका राज्य शासनाने कोल्हापूरची पूररेषा ठरवताना घेतल्याचे स्पष्ट दिसते.


पूरप्रवण खेडी आणि शहरांसाठी जल संधारण खात्याने पूर रेषा बनविण्याचा अहवाल तयार करावा. तसेच जल संधारण खात्याने निळी पूर रेषा जरी अंदाजे दाखविली असेल, तरी त्या रेषे पासून कमीत कमी ५० मी. अंतरा पर्यंत कोणत्याही बांधकामास महानगर पालिका, नगर पालिका, ग्रामपंचायत यांनी परवानगी देऊ नये असे आदेश हरित प्राधिकरणाने २०१५ मध्ये दिले होते.


त्यानंतर पंचगंगा आणि इतर पाच नद्यांच्या पूर रेषा ठरविण्याचे काम जलसंपदा विभागाने Unit Hydrology Method ही शास्त्रीय पध्दत वापरून २०१८ मध्ये पूर्ण केले व ते आयआयटी मुंबईला verification साठी देण्यात आले जे मुंबई आय आय टी ने योग्य प्रकारे झाले असे प्रमाणपत्र २५/७/१८ रोजी दिले. यामध्ये २५ वर्षांचा पूर ६०७१ क्युमेक्स (२,१४,३९५ क्युसेक्स) आणि १०० वर्षांचा पूर ८८९४ क्युमेक्स (३,१४,०८८ क्युसेक्स) गृहित धरून निळी आणि लाल पूररेषा निश्चित केली गेली होती.


स्वाभाविकपणे या आखणीमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली. या आखणीमुळे मोठ्या प्रमाणार जमिनी पूररेषेच्या आत येत होत्या. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना ९ ऑक्टोबर २०१८ मध्ये पत्र लिहून पूररेषेच्या नवीन आखणीबद्दल साशंकता व्यक्त केली. १९८९ चा पूर सर्वात जास्त होता त्याची आखणी डीपी आराखड्यावर केली आहे. त्यामुळे नवीन पूर रेषेची आखणी संयुक्तिक वाटत नाही. नवीन रेषेमुळे संभ्रम व भीतीची शक्यता आहे, नवीन रेषेमुळे बाधित होणारा बराच भाग रहिवासी विभाग आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. जुनी पूर रेषा असून, नवीन पूर रेषेचा घाट घातल्या मुळे नागरिकांमध्ये खूप रोष आहे. त्यामुळे डीपी मध्ये आखलेल्या मूळ पूर रेषाच कायम ठेवाव्यात असे त्यांचे म्हणणे होते.


इथे पूरपातळी आणि पूररेषा यातील फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. पूर पातळी म्हणजे एखाद्या वर्षी आलेल्या पुराने नदीकिनारी जी महत्तम पातळी गाठली असेल ती पूरपातळी आणि २५ व १०० वर्षात आलेल्या महत्तम पुरामुळे ज्या भागापपर्यंत पाणी येते ती पूररेषा. न्यायालयाने काही प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार सर्व नद्यांवर दर २५ वर्षात आलेल्या महत्तम पूर पातळीवर निळी रेषा तर १०० वर्षातील महत्तम पूरपातळीवर लाल रेषा चिन्हांकित करणे आवश्यक असते. कोल्हापुरच्या विकास आराखड्यात पूरपातळी दाखवण्यात आली आहे पूररेषा नाही.


बांधकाम व्यावसायिकांचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयात ३१ ऑक्टोबर २०१८ ला पोहोचले आणि त्याची तातडीने दखल घेतली गेली आणि लगेचच २ नोव्हेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले की अध्यक्ष, क्रेडाई, कोल्हापूर यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.म्हणजे जलसंपदा विभागाने शास्त्रीय पध्दतीने निश्चित केली पूररेषा गृहित न धरता २००५ साली विकास आराखड्यामध्ये गृहित धरलेल्या पूरपातळ्यांप्रमाणे बांधकामांना परवानगी देण्यात यावी.

दरम्यानच्या काळात जलसंपदा विभागाने कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवून कळवले की विकास आराखड्यात  १९८४, १९८९ व २००५ च्या पूर पातळ्या निळ्या, लाल आणि हिरव्या रंगात दाखविल्या आहेत. त्या पूर रेषा नसून त्या फक्त पहाणी आणि चौकशीवर आधारित पूर पातळ्या असून त्यासाठी कोणताही तांत्रिक व शास्त्रीय अभ्यास केलेला नाही. तथापी त्यांचा विकास आराखड्यात समावेश करण्यात आला आहे, नवीन शास्त्रीय पूर रेषांचे काम प्रगतीत आहे. सदर जुन्या पूर पातळ्या विचारात घेणेत येऊ नयेत आणि पूर प्रवण क्षेत्रात बांधकाम परवानगी नवीन पूर रेषांच्या आधीन रहाण्याच्या अटी वरच देण्यात यावी.


मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टिपणीनंतर सचिव जलसंधारण विभाग यांनी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना तातडीने पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे पूररेषा निश्चित करण्यास सांगितले. जलसंपदा विभागाने ५/३/२०१९ रोजी  पूररेषेच्या आखणीबाबत तांत्रिक टिपणी दिली. त्यात गेल्या ३० वर्षात पूर पातळी सध्याच्या निळ्या रेषेच्यावर १० वेळा तर सध्याच्या लाल रेषेच्या वर ६ वेळा गेली असल्याचे नमूद केले, आणि आहे त्याच पूररेषा कायम ठेवल्या तर पावसाळ्यात मनपा तसेच स्थानिक यंत्रणांना पुराच्या धोक्याबाबत दक्ष रहावे लागेल असेही नमूद करून धोक्याची जाणीव करून दिली. बांधकाम व्यावसायिकांच्या पत्रानुसार नवीन निळ्या रेषेमुळे  मुळे ४०० ते ५०० हेक्टर जमीन बाधित होऊन कोल्हापूरचा विकास खुंटेल व शहराच्या वाढीस जागा राहणार नाही असा आक्षेप घेण्यात आला होता, व कोल्हापूर मनपाने विकास आराखड्या मधील पूर रेषे प्रमाणे बांधकाम परवानग्या दिल्या आहेत, त्यामुळे डीपी मधील निळी रेषा अंतिम करावी अशी मागणी केली असली तरी मुख्यमंत्र्यांचे  निर्देशा प्रमाणे मूळ निळी रेषा कायम करणे हा धोरणात्मक निर्णय असल्याने शासन स्तरा वरून निर्णय घेणे उचित ठरेल असे नमूद करून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे निर्माण होणा-या धोक्याची सूचना देउन जलसंपदा विभागाने आपली जबाबदारी झटकली.


दरम्यान पंचगंगा आणि इतर पाच नद्यांच्या नवीन पूर रेषा Flood Frequency Analysis Method या पध्दतीने आखण्यात आल्या व पुन्हा आयआयटी मुबईला verification साठी  हा प्रस्ताव देण्यात आला .आधी पूररेषा निश्चित केली असताना पुन्हा ती निश्चित करण्याची गरज कुणाला आणि का भासली? याचे उत्तर कोणाकडेही नाही. या दुसर्‍या पूररेषा निश्चितीकरण प्रस्तावात मात्र पुराच्या पाण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आले. आधीच्या अहवालात २५ वर्षांचा पूर ६०७१ क्युमेक्स (२,१४,३९५ क्युसेक्स) आणि १०० वर्षांचा पूर ८८९४ क्युमेक्स (३,१४,०८८ क्युसेक्स) पूर गृहित धरून निळी आणि लाल पूररेषा निश्चित केली होती यावेळी २५ वर्षांचा पूर २७५२ क्युमेक्स (९७,१८६ क्युसेक्स) १०० वर्षांचा पूर ३४६६ क्युमेक्स (१,२२,४०० क्युसेक्स) प्रमाण गृहित धरण्यात आले. अर्थात तरीही ही पातळी मुख्यमंत्र्यांनी सूचित केलेल्या पातळीपेक्षा जास्तच आहे.


थोडक्यात म्हणजे कोल्हापुरची पूररेषा निश्चित करताना नागरिकांचे हित लक्षात घेण्याऐवजी बांधकाम व्यावसायिकांच्या हिताला मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य दिले आणि यंत्रणांनी मुख्यमंत्र्यांची इच्छा लक्षात घेउन शास्त्रीय आणि तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केले. आता प्रश्न असा आहे की पूर्णपणे तांत्रिक, शास्त्रीय आणि सामाजिक सुरक्षिततेशी संबंधित विषयांमध्ये राजकारण्यांनी ढवळाढवळ का करावी? या पूर रेषांशी झालेल्या खेळाला अंतिमतः जबाबदार कोण?

Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
                   
RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

Website –  http://vijaykumbhar.com _
                  https://vijaykumbhar-hindi.blogspot.com/
                  https://vijaykumbhar.blogspot.com/
                  http://surajya.org/
Email    –  admin@vijaykumbhar.com
                  kvijay14@gmail.com


शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

सर्वोच्च न्यायालयाचा गोयल गंगाला दणका, फ्लॅटधारकांमध्ये कहीं खुशी कहीं गम !

बांधकाम प्रकल्पामध्ये पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून वाढीव बांधकाम केल्याप्रकरणी पुण्यातीला  गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया प्रा. लिमिटेडला सर्वोच्च न्यायालयाने  १० कोटी किंवा प्रकल्पाच्या किमतीच्या १०% यापैकी जे जास्त असेल तितका  दंड ठोठावला आहे. तसेच हरित लवादाने ठोठावलेला ५ कोटींचा दंडही न्यायालयाने कायम ठेवला आहे.


 न्यायालयाने हरित लवादाने पुणे महापालिकेवर लादलेला दंड आणि पालिकेच्या दोषी अधिका-यांवर कारवाई करण्याचे दिलेले आदेश कायम ठेवले आहेत. हरित लवादाने पुणे महापालिकेला ५ लाख रुपये दंड ठोठावला होता.


 न्यायालयाने या प्रकल्पातील काही इमारती पाडण्यासाठी नकार दिला असला तरी प्रस्तावित दोन इमारतींमधील ४५७ फ्लॅट्स बांधण्यास नकार दिल्याने या प्रकल्पांमधील सदनिका धारकांमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम‘ असे वातावरण निर्माण होणार आहे.


 त्याचप्रमाणे पर्यावरण दाखल्याची तमा न बाळगता सदनिका घेणा-यांनाही या निर्णयाने मोठ्ठा धक्का बसणार आहे.

















सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथे गोगल गंगा डेव्हलपर्सने  गंगा भागोदय, अमृतगंगा आणि गंगा भागोदय टॉवर्स या इमारतीचे बांधकाम प्रस्तावित केले होते. या प्रकल्पात एकूण ५७ हजार ६५८.४२ स्क्वेअर मीटरचे बिल्टअप असून एकूण प्लॉट एरिया ७९ हजार १०० स्क्वेअर मीटर आहे.

या प्रकल्प आराखड्यात अनेकदा  बदल करीत पर्यावरण विभागाची परवानगी नसतानाही जवळपास लाख चौरस मीटर एवढय़ा क्षेत्रावर बांधकाम केले होते.

या संदर्भात आधी हरित लवादानेही गोयल गंगाला एवढाच मोठा दंड ठोठावला होता.

गोयल गंगाला ५७६५८.४२ चौरस मिटरसाठी  पर्यावरणाची परवानगी ४/४/२००८रोजी मिळाली होती.ती  परवानगी ५ वर्षांसाठी म्हणजे २०१४ पर्यंत होती. मात्र आतापर्यंत त्यांनी १ लाख चौरस मिटरपेक्षा जास्त बांधकाम केलेले आहे.

त्यामूळे २००८ च्या परवानगीपेक्षा  जास्त  केलेले बांधकाम पर्यावरणाच्या परवानगीचे उल्लंघन ठरते असा निष्कर्षही न्यायालयाने काढला आहे.

आतापर्यंत अनेकजण त्या प्रकल्पात रहाण्यासाठी आल्याने तो पाडण्याची याचिकाकर्त्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे .




या प्रकल्पातील  दोन इमारतींमध्ये आणखी प्रस्तावित ४५७ फ्लॅट्स बांधण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली असून .

या दोन इमारती २०१४ नंतर म्हणजे पर्यावरण विभागाच्या परवानगची मुदत संपल्यानंतर आणी नवी परवानगी न मिळवता केल्याने सदर फ्लॅट घेणा-यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.

मात्र गोयल गंगाने ज्या फ्लॅटधारकांकडून पैसे घेतले आहेत त्यांना त्यांची रक्कम ९ % व्याजासह परत देण्याचे आदेश दिले आहेत.

बांधीव क्षेत्रफळ आणि चटई क्षेत्र यातील वादावर पडदा टाकत सर्वोच्च न्यायालयाने बांधीव क्षेत्रफळ म्हणजे आकाशाकडे जे खुले नाही ते क्षेत्र म्हणजे बांधीव क्षेत्रफळ ज्यात तळघर  आणि सेवा क्षेत्रफळाचाही समावेश होतो असा निर्वाळा दिला आहे.






ज्या अधिका-यांनी चटई क्षेत्र आणि बांधीव क्षेत्रफळ याबाबत पर्यावरण विभागाची दिशाभूल केली त्या अधिका-यांच्या भुमिकेची दखल घेण्याचे  हरित लवादाने महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेले आदेश कायम तर ठेवलेच परंतु पर्यावरण विभागाच्या  तत्कालीन प्रधान सचिवांच्या भुमिकेचीही चौकशी करून त्याबाबत तीन महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगीतले आहे.

१४/९/ २००६ साली केंद्र शासनाने २ लाखा चौरस फुटावरील बांधीव ‌क्षेत्रफळाला पर्यावरण विभागाची परवानगी बंधनकारक केली होती . त्यासंदर्भात काढलेल्या आदेशात ‘बांधीव क्षेत्रफळ म्हणजे आकाशाकडे जे खुले नाही ते क्षेत्र‘ असा स्पष्ट उल्लेख केला होता .

त्यांनतर ४/४/२०११ रोजी एका ऑफिस मेमोरेंडमद्वारे  २००६ च्या अध्यादेशातील व्याख्या कायम करण्यात आली.

त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईने  ४/४/२०११ चा ऑफिस मेमोरेंडम पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे १४/९/२००६ पासून लागू न करता ४/४/२०११ नंतरच्या प्रकलपांना लागू करावी अशी मागणी केली .

अर्थातच बिल्डरांची मागणी म्हणजे जवळपास आदेशच असतो .

विशेष म्हणजे यावेळी गोयल गंगाचे एक संचालक अतुल गोयल क्रेडाईचे जॉइंट सेक्रेटरी होते

त्यामूळे मागणीनंतर अवघ्या दोन महिन्यात केंद्रिय पर्यावरण विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ आशिष शर्मा यांनी सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीने तसा ऑफ़िस मेमोरेंडम काढला.

ऑफिस मेमोरेंडम काढून कायद्यातील तरतुदीं निष्प्रभ करण्याच्या अधिका-यांच्या कृत्याबद्दल सर्वोच्च न्यायलयाने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

मात्र पुणे महापालिकेच्या अधिका-यांनी आपल्या अधिकाराच्या बाहेर जाउन गोयल गंगा प्रकल्पाला मदत केली या हरित लवादाच्या निष्कर्षाचे सर्वोच्च न्यायलयाने समर्थन केले आणि २००६ आणि २०११ च्या अध्यादेशातील बांधीव क्षेत्राची व्याख्या स्वयंस्पष्ट असताना देखील अधिका-यांनी गोयल गंगाला सोयीचे होइल असा त्याचा अर्थ लावला तेही ७/७/२०१७ चे स्पष्टीकरण यायच्या आधिच असे ताशेरेही न्यायालयाने ओढले आहेत.

गोयल गंगाने त्यांना ४ एप्रिल २००८ रोजी देण्यात आलेल्या पर्यावरण पर्यावरण परवान्याचे उल्लंघन करून बांधकाम केल्याचा हरित लवादाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.


मूळ याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत हरित लवादासमोर आणि सर्वोच्च न्यायालयासमोर पुणे पालिकेचे ,शासनाच्या पर्यावरण विभागाचे अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केले होते .

मात्र त्यातील एकाही अधिका-याला व्यक्तिगत पातळीवर प्रतिवादी न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले असून प्रतिवादी नसलेल्या व्यक्तींवर त्यांची बाजू न ऐकता भाष्य करता येत नसल्याचे नमूद केले आहे. त्याच प्रमाणे सदर याचिकेला जनहित याचिका संबोधण्यासही नकार दिला.

सहा महिन्यांच्या आत न्यायालयात दंडाची रक्कम न भरल्यास मालमत्ता जप्त करून त्या विकून दंडाची रक्कम वसूल करण्याबरोबरच सहा महिन्यात दंडाची रक्कम न भरल्यास गोयल गंगा प्रा ली आणि त्यांच्या सर्व संचालकाच्या प्रकल्पांना देण्यात आलेल्या परवानग्या नोंदणी रद्द करण्याचे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणत्याही परवानग्या पुन्हा न देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत .


दंडाच्या रकमेचा विनियोग कसा करायचा याबद्दल न्यायालय २२ ऑक्टोबर २०१८ रोजी निर्णय देणार आहे.


गृहप्रकल्पाच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या नियमांना किती महत्व आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने दिसून आले.

तीन चार वर्षांपूर्वी मी पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी आवश्यक  पर्यावरण दाखल्याशिवाय सुरू केलेले सुमारे १५० प्रकल्प बेकायदा ठरत असल्याबद्दल लिहिले होते . या पोस्टच्या शेवटी त्याची लिंक दिली आहे.


त्यानंतरही अनेक ग्राहकांनी पर्यावरण दाखल्याचा विचार न करता  सदनिका घेतल्या.त्यांना आता या निर्णयाने मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. 
Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
                     
RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com