ईव्हीएमवरील कुठलेही बटन दाबले तरी मत विशिष्ट पक्षालाच जाते असा आरोप पूर्वी व्हायचा.आता व्हीव्हीपॅट आल्यानंतर ज्या उमेदवाराच्या चिन्हासमोरचे बटन दाबले त्याची चिट्ठी व्हीव्हीपॅट प्रिंटरवर न दिसता दुस-याच उमेदवाराची दिसली असे आरोप केले जात आहेत. दुर्दैव म्हणजे असे आरोप करणा-यांमध्ये देशातील दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे.
मतदान झाल्यानंतर बाहेर येउन असे आरोप करणा-यांची संख्या मोठी आहे. मात्र असे घडल्यानंतर त्यानुसार करावयाची तक्रार केल्याचे एकही उदाहरण आढळून येत नाही.
कागदी चिट्ठीवर (व्हीव्हीपॅट) छापलेल्या मतदानाच्या तपशीलाविषयी काही शंका असल्यास त्याबद्दलची कार्यपद्धती निवडणूक नियमावलीत आहे. (THE CONDUCT OF ELECTIONS RULES 19621 , 49MA )
त्यानुसार जेथे व्हीव्हीपॅट प्रिंटर वापरण्यात आले असतील तिथे एखाद्या उमेदवाराने त्याचे मत नोंदवल्यानंतर प्रिंटरवर मुद्रित केलेल्या कागदी चिट्ठीवर त्याने मत दिलेल्या उमेदवारापेक्षा इतर उमेदवाराचे नांव किंवा चिन्ह दर्शविण्यात आले आहे असा आरोप केल्यास मतदान केंद्राध्यक्षाने , त्याला खोटे प्रतिज्ञापत्र / शपथपत्र केल्याच्या परिणांमाविषयी चेतावणी देउन अशा मतदाराकडून शपथपत्र घ्यावयाचे असते.
शपथपत्र दिल्यानंतर म्हणजे अशा प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा फॉर्म १७ सी भरून घेतल्यानंतर मतदान केंद्राध्यक्षाने संबधित मतदाराच्या मताची दुस-यांदा परंतु मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या उपस्थितीत म्हणजेच त्यांच्या समक्ष मतदार यंत्रात मतदान घेउन चाचणी घ्यायची असते आणि प्रिंटरवर आलेल्या कागदाची चिट्ठी पहावयाची असते.
आरोप खरा असल्यास मतदान केंद्राध्यक्षाने सदर वस्तुस्थिती निवडणूक निर्णय अधिका-याला कळवायची असते आणि पुढील मत नोंदणी थांबवायची असते.
अशी तरतुद असतानाही आजतागायत आरोप करणा-यांपैकी कुणीही वरील नियमानुसार तक्रार केल्याचे दिसून येत नाही. याचे एकच कारण असावे ते म्हणजे तक्रार खोटी असल्यास होणा-या शिक्षेचे भय.
ईव्हीएम वर बटन एकाचे दाबले आणि व्हीव्हीपॅटवर चिट्ठी दुस-याची आली असा आरोप करणारे एक बाब विसरातात की असे आरोप करून ते व्हीव्हीपॅटला निर्दोष असल्याचे सर्टीफिकेट देतात आणि ईव्हीएमला आरोपीच्या पिंज-यात उभे करतात.
म्हणजे त्यांना असे म्हणायचे असते की आम्ही ईव्हीएम वर ‘अ‘ उमेदवाराचे बटन दाबले परंतु ईव्हीएमने ते ‘ब‘ ला दिले म्हणून व्हीव्हीपॅटच्या प्रिंटरवर ’ब’ची चिट्ठी छापली गेली. म्हणजे त्यांना म्हणायचे असते की ईव्हीएमने खोटेपणा केला पण तो व्हीव्हीपॅटने उघडकीस आणला.
असे आरोप हे अत्यंत बालीशपणाचे आहेत.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे प्रोग्रामिंग करताना जर असे उद्योग करता येत असतील तर काहीही करता येणे शक्य आहे.
म्हणजे व्हीव्हीपॅटवर ’अ‘ दिलेले मत ’ब‘ ला जात असल्याचे दाखवत असल्याचा आरोप खरा मानायचा आणि जर ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटशी छेड्छाड करता येत असेल तर ‘अ‘ दिलेले मत ’ब‘ ला जाईल मात्र व्हीव्हीपॅटवर चिट्ठी मात्र ’अ‘ चीच दिसेल अशा प्रकारचे प्रोग्रामिंगही करता येणे शक्य नाही का?
आणि असे जर झाले तर निवडणूक प्रकियेसंदर्भात तक्रार करायला आणि शंका घ्यायला जागासुद्धा उरणार नाही.
त्यामूळे अमक्याचे बटन दाबले आणि तमक्याला मत गेले या आरोपात मला तथ्य वाटत नाही.
अशाच प्रकारचा दुसरा बालिश आरोप म्हणजे अमूक तमूक उमेदवाराच्या समोरील बटन दाबले की विजेचा शॉक लागतो.
माझ्या माहितीप्रमाणे सर्वात प्रथम हा आरोप केला गेला तो ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या मराठी सिनेमातील ना-याने म्हणजे मकरंद अनासपुरेने.
ना-या केवळ हा आरोप करून थांबला नाही तर असले आरोप करून त्याने निवडणूक जिंकलीसुद्धा!
अर्थात हे केवळ सिनेमातच घडू शकते आणि त्यातूनच ख-या निवडणूकातील अल्पमती उमेदवारांनी प्रेरणा घेतली असावी.मतदारांनी प्रयोग म्हणून आपल्या पक्षाचे किंवा उमेदवाराचे बटन दाबावे यासाठी पसरवली जाणा-या या अफवा आहेत असे म्हणायला जागा आहे.
आपल्या देशात ईव्हीएम किंवा ईव्हीएमसह व्हीव्हीपॅटद्वारे मतदान प्रक्रियेवर विश्वास नसलेल्या लोकांची संख्याही लक्षणीय आहे.त्यांच्या आरोपात तथ्य आहे की नाही हा भाग अलाहिदा.
परंतु ज्यांना अशा प्रक्रियेवर विश्वास नाही त्यांनी केवळ दोष देण्यापेक्षा त्यावर असलेल्या उपायांची अंमलबजावणी अगदी सर्वत्र नाही तरी प्रयोग म्हणून काही ठिकाणी केली असती तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते.
उदाहरणार्थ, एका मतदान केंद्रात जास्तीत जास्त चार ईव्हीएम लावले जाउ शकतात. एका ईव्हीमवर १६ खाचे (स्लॉट) असतात म्हणजे चार ईव्हीएमचे मिळून झाले ६४ खाचे.
त्यातील एकावर नोटाचा पर्याय असतो. उरले ६३ खाचे.
त्यामूळे एखाद्या मतदार संघात जास्तीत जास्त ६३ उमेदवारच असतील तरच ईव्हीएमद्वारे निवडणूक घेतली जाउ शकते.
त्यापेक्षा जास्त उमेदवार असतील तर पारंपारिक पद्धतीने म्हणजे बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागते.
अगदी सर्व मतदार संघात इतके उमेदवार उभे करता येणे शक्य नसले तरी ज्या राष्ट्रीय पक्षांचा ईव्हीएमला विरोध आहे त्यांनी असा प्रयोग, विशेषत: जिथे त्यांचे विरोधक कमकुवत आहेत त्या ठिकाणी करायला हवा.
केवळ ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटवर दोष ढकलून कांगावा करण्यात काय अर्थ आहे? आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी पुरावा गोळा करणेही आवश्यक आहे!
त्यामूळे अमक्याचे बटन दाबले की तमक्याला मत जाते असा किंवा तत्सम आरोप करणा-यांनी माध्यमांकडे जाउन अश्रू ढाळण्यापेक्षा रितसर तक्रारी कराव्यात.
आणि मतदारांनीही कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता त्यांना योग्य वाटेल अशा उमेदवारासमोरचे बटन खुशाल दाबावे.
Related Posts
Subscribe for Free
To receive free emails or free RSS
feeds, please, subscribe to Vijay
Kumbhar's Exclusive News & Analysis
RTI KATTA is a platform to empower
oneself through discussions amongst each other to solve their problems by using
Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model
Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.
RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199
Website – http://vijaykumbhar.com _
Email – admin@vijaykumbhar.com
Facebook - https://www.facebook.com/kvijay14
Twitter
- https://twitter.com/Vijaykumbhar62
YouTube - https://www.youtube.com/vijaykumbhar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा