विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: पुणे महापालिका आयुक्तांना पत्र ," बादली प्रकरणाची" चौकशी नको

Monday, September 8, 2014

पुणे महापालिका आयुक्तांना पत्र ," बादली प्रकरणाची" चौकशी नको

प्रती मा.श्री .महेश पाठक ,
आयुक्तपुणे महानगरपालिका,
पुणे
महोदय
शहरात सध्या पुणे महापालिकेच्या कचरा वर्गीकरणासाठी खरेदी करण्यात आलेल्या बादल्यांची अंदमानात विक्री होत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. या बादल्या म्हणे अंदमान मध्ये सापडल्या. या बातमीनंतर काही नसते उद्योग करणा-या सामाजीक संघटनांनी म्हणे या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली.खरेतर या प्रकरणात मूळात चौकशी सारखे काही नाहीच. पुणे महापालिकेतील इतर घोटाळ्यांच्या तुलनेत हा प्रकार म्हणजे दर्या मे खसखस‘ आहे. शिवाय स्वयंसेवी संस्थांच्या मागणीनुसार प्रत्येक घोटाळ्याची चौकशी करायची झाली तर महापालिकेच्या अधिका-यांना दुसरे कामच उरणार नाही.

पालिकेच्या पदाधिका-यांना आणि अधिका-यांना किती कामे असतात ?. वाढीव दराची पुर्वगणन पत्रके तयार करायची असतात. सोयीच्या ठेकेदाराला काम मिळण्यासाठी अनुकुल अशा निविदा अटी तयार करायच्या असतात. त्यातूनही कोणी उपटसुंभाने निविदा भरलीच तर तो बाद कसा होइल याची दक्षता घायची असते. निविदेप्रक्रियेबद्दल कोणत्याही मिटींग मध्ये गैरसोयीचे प्रश्न विचारले न जाता निविदा कशी मंजूर होइल याची काळजी घ्यायची असते. कितीही निकृष्ट काम केले तरी त्याकडे प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करायचे असते. ठेकेदाराला व्यवस्थित आणि वेळच्या वेळी,कधी कधी वाढीव आणि कधी कधी काम न करतासुद्धा बीले मिळतील याची दक्षता घ्यायची असते. इतकी कामे असताना कोणत्याही अधिका-याच्या मागे चौकशीचे नसते झेंगट लावून कसे चालेल?. शिवाय पालिकेच्या प्रथेप्रमाणे चौकशी करायची झाली तर चौकशीच्या आधी संबधितांना निर्दोष कसे सोडवायचे याचा मार्ग तर सापडला पाहिजे.

असो. तर वरीलसर्व बाबींचा विचार करून सदर प्रकरणात पालिकेने कोणतीही चौकशी करू नये . सवयंसेवी संस्थांच्या तोंडावर फेकण्यासाठी आम्ही स्वयंस्त्फुर्तीने या प्रकरणाबाबत एक अहवाल सादर करीत आहोत. हवे तर याला चोंबडेपणा म्हणावे परंतु या अहवालाचा स्विकार करावा हि विनंती.

याप्रकरणासंदर्भात खालील दोन शक्यता असू शकतात
१)या प्रकरणातील बादल्या खरेदीचा आणि पुणे महापालिकेतील पदाधिकारी- अधिका-यांचा कोरिया दौरा यांचा कालावधी एकच आहे. त्यातून असा निष्कर्ष निघतो की पालिकेच्या खर्चाने खरेदी केलल्या वस्तूंवर स्वत:चे नाव कोरून त्या जनतेला देउन तीला उपकृत करण्याचे प्रगत तंत्रज्ञान कोरियाला शिकविण्यासाठी या बादल्या खरेदी केल्या असाव्यात. कोरियाला नेताना त्यातील काही बादल्या घरंगळून अंदमानला पडल्या असाव्यात आणि तेथील भंगारवाल्याने विक्रिसाठी त्या ठेवल्या असाव्यात.आता भारतातूनन कोरियाला जाणारे विमान अंदमान वरून जाते की नाहीयाच्या तपशीलात जाण्याचे कारण नाही. कदाचित जात असेलही आणि नसेल जात तर त्यादिवशी हवामान खराब असल्याने नेले असेल ते अंदमान वरून  क़िंवा अगदी काही नाही तरी दौ-रावर गेलेल्या स्वयंसेवी संस्थाच्या अल्पवयीन प्रतिनिधींनीसमुद्र पहाण्याचा आग्रह धरल्याने नेले असे विमान अंदमानवरून, त्यात गहजब करण्यासारखे काय आहे?.

२) आम्हाला सुत्राकंडून मिळालेल्या माहितीनुसार दुसरी शक्यता अशी आहे कीकोरियाचा अभ्यासदौरा‘ पूर्ण झाल्यानंतर पालिकेच्या खर्चाने दौ-यावर गेलेल्या अधिका-याच्या लक्षात आले की आपल्याला दौ-याचा अहवाल द्यावा लागणार. आणि अहवाल लिहायचा तर शांत ठिकाण हवे म्हणून त्यांनी पदाधिका-यांना विनंती केली कि अह्वाल लिहिण्यासाठी थोडे कुठतरी थांबूया.त्यावर अंदमानला थांबायचे निश्चित झाले. विमानाच्या ड्रायव्हरने सुरूवातीला थोडे काकू केले परंतु विमान अंदमानला थांबवत कसे नाही?,स्वखर्चाने दौ-रावर आलोय असा सज्जड दम एका पदाधिका-याने भरल्यानंतर नाइलाजाने त्याने ते अंदमानला नेले.तीथे अधिकारी अहवाललिहिण्यासाठी खाली उतरले तर पदाधिका-यांनी आता आलोच आहोत तर आपल्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती अंदमानच्या लोकांनाही करून द्यावी या उद्दात हेतूने त्यांनी काही बादल्या तिथल्या लोकांना दिल्या. आता त्या करंट्यांनी त्या विक्रिला काढल्या त्यात पालिकेच्या अधिकारी पदाधिका-यांचा काय दोष?.

एका पदाधिका-याने पालिकेच्या बादल्या विकल्या जात असल्याची तक्रार केली असली तरी त्यात त्यांचा दोष नाही. इतर पदाधिकारी अंदमानला खाली उतरले तरी त्या उतरल्या नव्हत्या.त्यामूळे विमान उडाल्यानंतर त्यांना रस्त्यावरच्या दुकानात आपल्या बादल्यांची विक्री होत असल्याचे दिसलेम्हणून त्यांनी दौ-यावरून परतताच त्याबाबत आयुक्तांकडे तक्रार केली . मात्र परिस्थिती लक्षात आल्याने त्यांनी आपल्या तक्रारीचा पाठपुरावा केला नाही. आता पुन्हा जवळ जवळ आठ महिन्यानंतर हे प्रकरण उकरून कोणी आणि का काढले याचा उलगडा होताच त्याबाबतचा अहवाल आपणास सादर करू .


दरम्यान कोरिया दौ-याच्या अहवालाचे काय झाले संबधित अधिका-यांनी तो दिला का?. कृपया उलट टपाली कळवावे ही विनंती.

No comments:

Post a Comment