सोमवार, १३ जानेवारी, २०२५

पंधरा वर्षानंतरही माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टींच्या हत्येच्या आरोपींचा तपास नाही, संतोष देशमुख प्रकरणाचे काय होणार?

मागील सुमारे दीड महिना मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गाजत आहे. तशी महाराष्ट्रामध्ये छोटी मोठी दहशतीचे केंद्र अनेक आहेत. परंतु मस्साजोग प्रकरणाने सर्वांवर कहर केला, राज्याची अब्रू धुळीला मिळवली. या प्रकरणातील क्रोर्य अंगावर शहारे आणणारे होतं. परंतु राज्यात किंवा देशात घडलेलं दहशतीचं हे पहिले प्रकरण नाही. पंधरा वर्षांपूर्वी सतीश शेट्टी या माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या झाली. त्यानंतर राज्यात आणि देशात अशा अनेक हत्या झाल्या. परंतु त्यांच्या हत्येचा तपास मात्र अपवादानेच लागला. 

Santosh Deshmukh

माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येला आज पंधरा वर्षे पूर्ण झाली.परंतु हत्येचा तपास मात्र पूर्ण झालेला नाही. या प्रकरणात इतका काही चढ-उतार झाला की आरोपींचा तपास लागणे दूर राहिले सतीश शेट्टी नावाची व्यक्ती अस्तित्वात होती की नाही याची शंका यावी अशी परिस्थिती निर्माण झाली. शेट्टी यांची हत्या झाली त्यावेळीही महाराष्ट्रामध्ये फार मोठा गदारोळ झाला होता. सर्व स्तरावरून या हत्येचा निषेध केला जात होता. मोर्चे निघाले,आंदोलने झाली परंतु प्रत्यक्षात मात्र काही घडले नाही. या हत्येचा तपास अधांतरीच राहिला. सुरुवातीच्या काळात आक्रमक असणारे राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वांचा सहभाग हळूहळू कमी झाला. आता सतीश शेट्टीचे बंधू संदीप शेट्टीएकाकी ही लढाई लढत आहेत.


असं का होतं? सतीश शेट्टी, संतोष देशमुख किंवा इतरही  अनेक कार्यकर्ते असतील त्यांच्या हत्येच्या तपासामध्ये दिरंगाई का होते? आरोपी सापडत का नाहीत?  आरोपींना वेगवेगळ्या सवलती का दिल्या जातात? अगदी सर्व राजकीय पक्ष,  सामाजिक कार्यकर्ते व जनमत विरोधात असतानाही  तपासामध्ये यंत्रणा दिरंगाई का करतात?. याचे कारण एकच. अशा हत्यांशी संबंधित असलेल्या आरोपींचे आणि त्यांच्या आकांचे असलेले सर्वपक्षीय सलोख्याचे संबंध. अर्थात अशा सलोख्याच्या संबंधांमध्ये मोठा हिस्सा हा आर्थिक,जातीय लागेबांध्यांचा किंवा मतांच्या राजकारणाचा असतो याच्यात मात्र कोणतीही शंका नाही.

Satish Shetty

सतीश शेट्टी आणि संतोष देशमुख प्रकरणातील साम्य म्हणजे ही दोन्ही प्रकरणे भ्रष्टाचाराविरोधी लढ्याशी संबधित आहेत आणि दोन्ही प्रकरणे कार्यकर्त्यांची सुरक्षा, न्यायव्यवस्था आणि यंत्रणांतील सडलेल्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करतात. दोन्ही व्यक्ती आपल्या ठिकाणी समाजाच्या हितासाठी आणि सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कृत्यांविरोधात उभ्या राहिल्या होत्या. परंतु त्यांना न्याय मिळण्यात होणारा विलंब आणि अपारदर्शकतेमुळे ही प्रकरणे वादग्रस्त ठरली आहेत. 

सतीश शेट्टी यांनी पुणे जिल्ह्यातील अनेक जमीन घोटाळ्यांचा पर्दाफाश केला होता. विशेषत: त्यांनी भूसंपादनातील गैरव्यवहार , अनियमितता, आणि भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी माहिती अधिकाराचा प्रभावी वापर केला होता. त्यांच्या कामामुळे शक्तिशाली लोकांचा आर्थिक स्वार्थ धोक्यात आला, ज्यामुळे त्यांना सातत्याने धमक्या येत होत्या.१३ जानेवारी २०१० रोजी मॉर्निंग वॉकदरम्यान त्यांची  हत्या करण्यात आली.

संतोष देशमुख हेही एक सामान्य नागरिक होते-  सरपंच होते, त्यांनीही भ्रष्टाचारविरोधी लढ्यासाठी आपला आवाज बुलंद केला.देशमुख हे महाराष्ट्रातील एका खाजगी विकास प्रकल्पातील गैरव्यवहाराच्या विरोधात लढा देत होते. संतोष यांनी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचे आरोप लावले., ज्यामुळे राजकीय आणि आर्थिक शक्ती असलेले लोक त्यांच्या मागे लागले. धोका असल्याची वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानंतर त्यांची हत्या झाली. सतीश आणि संतोष दोघांनीही आपल्या जीवाला धोका असल्याचे सतत सांगितले होते. परंतु सरकार आणि यंत्रणा त्यांना योग्य संरक्षण देण्यात अपयशी ठरल्या. 

हे सगळं आपोआप घडलं असेल का? अजिबात नाही. आपल्या कार्यक्षेत्रात गैरप्रकार घडत आहेत हे संबंधित राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि प्रशासन या सगळ्यांना माहिती असतं. किंबहुना या सर्वांचा त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे असे प्रकार घडत असतात आणि त्यांच्यावर पांघरूणही घातलं जातं आणि तसं पांघरूण घातलं जावं, आपले गैरव्यवहार सुरळीतपणे चालावेत यासाठीच सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे नेते यांना आपल्या कार्यक्षेत्रांमध्ये आपल्या मर्जीतले अधिकारी हवे असतात आणि त्यासाठी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते आपली प्रतिष्ठा पणाला लावतात.त्यामुळे किमान महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या “मर्जीतले” अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नियम डावलूनवर्षानुवर्षे काम करताना दिसतात. 

हे सगळं एकमेकांशी लागेबांधे असल्यामुळेच घडतं. त्यामुळे त्या क्षेत्रातले गैरप्रकार उघडकीस आणण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला थांबवण्यासाठी, अडवण्यासाठी,  त्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी किंवा त्याला संपवण्यासाठी हे सगळे जण एकत्र येतात आणि त्यातूनच सतीश शेट्टी किंवा संतोष देशमुख अशी प्रकरण घडतात. असे प्रकार घडल्यानंतर काही काळ सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याचा आभास निर्माण करतात परंतु सरते शेवटी काहीही होत नाही.उलट ज्या व्यक्तीने भ्रष्टाचार उघड केला, गैरव्यवहार उघडकीस आणला ती व्यक्ती एकेकाळी अस्तित्वात होती की नव्हती अशी परिस्थिती निर्माण केली जाते. संतोष देशमुख प्रकरणांमध्ये तरी तसं काही घडू नये एवढीच अपेक्षा