बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

पर्यावरणपूरक ई-रिक्षा प्रवासी वाहतुक क्षेत्रातील नवी क्रांती

राज्य सरकारने ई रिक्षाची नियमावली जाहीर करून त्या चालविण्यास मुंबई व रायगड वगळता सर्वत्र त्या सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर राज्यभरातील रिक्षा चालक मालकांकडून त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते त्याप्रमाणे ती उमटलीही.त्याचप्रमाणे केंद्र सरकारने नुकतेच एका अधिसूचनेद्वारे प्रवाशी वाहतुकीसाठी आवश्यक असणारा परवाना ई रिक्षासाठी गरजेचा नसल्याचे जाहीर केल्याने आगामी काळात आणखीही तीव्र प्रतिक्रिया उमटणार हे नक्की.परंतु यासंदर्भात कोणतेही मत बनवण्यापूर्वी या ई रिक्षांबाबतचे धोरण काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. या  ई रिक्षा धोरणाचा मुख्य उद्देश सायकल रिक्षा चालरवणाऱ्या व्यक्तींना या माध्यमातून सायकल रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तींना व्यवसायाच्या संधी निर्माण करून देणे, महिला आणि अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व  शहरातील वायुप्रदूषणाची पातळी कमी करणे हे आहेत. 


Photo courtsey indianexpress.com


महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या धोरणात  केवळ सायकल रिक्षा चालविणा-या चालक मालक यांनाच ई रिक्षाचे परवाने देण्यात येणार असल्याचे म्हटले असले तरी आता केंद्र शासनाने मूळ परवान्याचीच अट काढून टाकल्याने आता कुणालाही ई रिक्षा चालवण्यासाठी परवान्याची गरज उरलेली नाही. ई-रिक्षावरून महाराष्ट्रात राजकारण सुरू होते, त्यामुळे राज्य सरकार ई-रिक्षाला परवानगी देण्यास टाळाटाळ करीत होते. मात्र, मोटरवाहन कायद्यातील कलम-६६ (१) मध्ये वाहनांना परवाना बंधनकारक असला तरी हा नियम ई-रिक्षा किंवा ई-कार्टला लागू होणार नाही, असा निर्णय केंद्राने ३० ऑगस्टला घेतला. त्यामूळे आता सरसकट राज्यभरात ई-रिक्षा व ई-कार्टच्या वापराचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता या ई रिक्षांना पेट्रोल किंवा गॅसवर चालणा-या रिक्षांचे चालक मालक विरोध करणार हे उघड आहे.त्यांचा विरोध स्वाभाविकही आहे . परंतु काळाबरोबर तंत्रज्ञान बदलते आणि जुन्या गोष्टी कालबाह्य होतात. आणि असे  बदल जर पर्यावरणपूरक असतील तर त्याचे स्वागतच करायला हवे . अर्थात त्यामूळे काहीजणांचे नुकसान होते हे मान्य असले तरी असे बदल हे अपरिहार्य असतात . शिवाय असे बदल जार सामान्य माण्साच्या हिताचे असतील तर त्याला जनतेचाही भरघोस पाठिंबा मिळतो आणि त्यामूळे शासनला कायदेही ती जनभावना विचारात घेउन करावे लागतात.ॲपवर आधारित टॅक्सी सेवांच्या बाबतीत तेच घडले. या सेवेकडॅ  प्रवाशांचा अधिक कल असल्याने या वाहनांवरकारवाई करण्याच्या मागणीवरून मध्यंतरी ओला उबेरच्या विरोधात रिक्षा टॅक्सी संघटनांनी संप पुकारला.परंतु त्यांना जनतेची सहानुभुती मिळाली नाही.उलट नेहमीच्या रिक्षा टॅक्सी चालकाबद्दल नागरिकांच्या मनात असलेली खदखद यावेळी सोशल मिडीयाच्या माध्यमातून बाहेर पडली.

ओला, उबेर सारख्या सेवांमुळे सामान्य माणसाचे जीवन थोडे तरी सोपे झालेय, त्यांची सेवा उत्तम आहेच,रिक्षावाल्यांप्रमाने भाडे नाकारत नाहीत, पैसे किलोमीटर प्रमाणे आकारतात. योग्य पैशात, कुठल्याही कटकट आणि दगदगी शिवाय ग्राहकाला परवडणाऱ्या भाड्यात ते इच्छहीत स्थळी नेऊन पोचवतात, रिक्षावाल्यासारखेमनात येईल ते आकडे सांगत नाहीत ,ओला.उबेर ला विरोध करण्यापेक्षा ह्यांनी रिक्षा टॅक्सीवाल्यांनी काही नियम बनवून ते पाळायला हवेत . अशाच प्रतीक्रिया सोशल मिडीयामधून व्यक्त झाल्या.

ई रिक्षामूळे इतर रिक्षावाल्यांच्या व्यवसायावर कदाचित परिणाम होईलही.परंतु अशा घटना नेहमीच घडत असतात . पाटा वरवंटा जाउन मिक्सर आले,सायकल जाउन स्कूटर आल्या किंवा अगदी घोडागाड्या जाउन रिक्षा आल्या त्यावेळी त्या त्या व्यवसायातील लोकांवर त्याचा परिणाम झाला म्हणून काही तो बदल थांबवला गेला नाही.तसा तो थांबवताही येणार नाही.ई रिक्षासारखे नवे पर्याय ही काळाची गरज आहे . या रिक्षा पर्यावरण पूरक तर आहेतच परंतू या क्षेत्रातील तज्ञांच्या मते ज्या काळात वीजेची मागणी कमी असते त्या काळात या रिक्षांची बॅटरी चार्ज केली तर वाया जाणारी वीज वाचेल. शिवाय आगामी काळात सौर उर्जेवर त्या चार्ज केल्या जातील. उद्या ई रिक्षापेक्षाही चांगले आणखी काही पर्याय उपलब्ध झाल्यास त्याचे स्वागतच करावे लागेल.परंतु सध्यातरी ई रिक्षाच्या रुपाने प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात एक नवी क्रांती येउ पहातेय.त्याचप्रमाणे अद्यापही उद्योग जगताचे या क्षेत्राकडे फारसे लक्ष गेले नसल्याने उत्पादनाच्या व  किमतीच्या बाबतीत स्पर्धा निर्माण झालेली नाही. परंतु आगामी काळात ती निश्चितपणे होइल.  

भारतीय मायक्रो क्रेडिटने लखनौमध्ये आयोजित केलेल्या ई-रिक्षा वितरण कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते त्यावेळी त्यांनी सायकल रिक्षा चालविणा-यांना ई रिक्षाचे वितरण केले. ई-रिक्षाच्या माध्यमातून पर्यावरणाचाही लाभ आहे. संपूर्ण जग ग्लोबल वार्मिंगने त्रस्त आहे. आम्हाला परदेशातून तेल आयात करावे लागत आहे, अरबो-खरबो रुपयांचा खर्च आहे. आता त्या तेलातही बचत होईल, कारण ई-रिक्षाची बॅटरी सौर ऊर्जेवर चालणार आहे. धूर होणार नाही, यामुळे सामान्य व्यक्तीच्या आरोग्यालाही फायदा आहे. जगभर ग्लोबल वार्मिंगची चिंता आहे, त्याचा उपायसुद्धा याच माध्यमातून मिळेल . 

त्याचप्रमाणे नुकतेच काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी एका मोबाईल ऍप्लीकेशनचेही उद्घाट्न केले यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले होते की . जो व्यक्ती मोबाईलवर हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करेल, त्याला एका क्लिकच्या माध्यमातून जवळच्या ई-रिक्षावाल्याकडे सूचना करता येईल. दोन-चार मिनिटात रिक्षा तुमच्यासमोर हजर असेल. आता मी रिक्षात बसून आलो. याच तंत्रज्ञानाने रिक्षा बोलावली होती आणि त्याच रिक्षात बसून मी आलो. खिशात पैसे नसले तरी चालेल, जर तुमचे जन-धन खाते असेल, रुपे कार्ड असेल तर मोबाईल फोनच्या माध्यमातून पाच रुपये, सात रुपये, दहा रुपये, जे काही भाडे असेल तर मोबाईलच्या माध्यमातून देऊ शकता, अगदी आरामात. पूर्वी चार व्यक्तींनी जरी रिक्षासाठी हात केला तर, कोणी रिक्षावाला पाहत नसे, आज तुम्ही मोबाईल फोनच्या माध्यमातून ऑटोरिक्षा, ई-रिक्षा बोलवू शकता. ई-रिक्षात बसून तुम्ही जाऊ शकता. या व्यवस्थेमुळे त्यांना ग्राहकाचा शोध घेत फिरण्याची गरज नाही, नाही तर ते इकडे-तिकडे पाहत असत, कोणी मिळते का, आता याची आवश्यकता नाही. ते एका जागी उभै राहतील, जशी मोबाईल फोनवर सूचना आली की पुढे जाईल. असे खुद्द पंतप्रधानांनीही म्हटले होता याचा विचार ई रिक्षाला विरोध करणा-यांनी केला पाहिजे.

Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis


RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.


RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199
Website – http://surajya.org/