मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

निवडणूकीतील उमेदवाराच्या विवरणपत्रातील माहितीचा खरेखोटेपणा तपासणे गरजेचे

एकदा प्रयत्न करून तर पहा आपल्या गरीब, प्रामाणिक आणि जनसेवेस उत्सुक असलेल्या उमेदवारांच्या नातेवाईकांची खरी परिस्थिती काय आहे ती.या नातेवाईकांचे कोण कोण भागीदार आहेत त्यांचे आणखी पुढे कोण भागीदार आहेत याची माहिती घेतल्यास बरेच काही उघडकीस येउ शकते.


काही दिवसांपूर्वी निवडणुकीत मतदारांना पेसै वाटप केल्याप्रकरणातील सहआरोपी आमदार सीताराम घनदाट तसेच रत्नाकर गुट्टे यांना अटक करण्यात आली.या दोन धनाढ्य उमेदवारांच्या अटकेमुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली असली तरी त्यात नवे असे काहीच नाही आजपर्यंत असे अनेकदा घडले आहे. सध्या ते उमेदवार जामिनावर सुटले असले तरी पुढे काहीही घडणार नाही त्यांना काहीही शिक्षा होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आतापर्यंत अगदी व्हिडिओ कॅमे-यावर अशा पैसे वाटपाचे चित्रिकरण सापडूनसुद्धा कोणालाही शिक्षा झालेली नाही.

उमेदवार पैसे वाटताना सापडतात यापेक्षाही जास्त महत्वाचा प्रश्न आहे तो या उमेदवारांकडे एवढा पैसा येतो कुठून? त्यांनी निवडणूकीसाठी सादर केलेली विवरण पत्रे पाहिली तर काही उमेदवारांचे दोन वेळेचे जेवण तरी त्यात भागत असेल का अशी शंका वाटते.अशी विवरण पत्रे सादर केली जातात आणि त्यावर कोणीही हरकत घेत नाही किंवा घेउ शकत नाही याला कारण कायद्यातील उणीवा.या उणीवा दुरूस्त करण्याचा प्रयत्न आजतागायत कुणीही केला नाही.

मतदारांना मतदानापूर्वी उमेदवाराची इत्यंभूत आणि खरी माहीती मिळाली पाहिजे, त्याचा तो हक्क आहे. आणि त्यासाठीच निवडणूकीसाठी उभा रहाणा-या उमेदवाराने आपल्या बाबतचा संपूर्ण खरा तपशील शपथपत्राद्वारे देणे आवश्यक असते.परंतू सर्वच उमेदवार खरेच तसा संपूर्ण तपशील देतात असे मात्र नाही.त्यासाठी कायद्यातील पळवाटांचा आधार घेतला जातो.  

यावेळीही विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत मालमत्तेचा तपशीलही प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक विभागाकडे सादर केला आहे.त्यावर नजर टाकली असता खालील बाबी आढळून येतात.

१)काही उमेदवारांनी आपली मूले किंवा इतर नातेवाईक स्वतंत्र कुटूंब असल्याचे दाखवून आपल्या ख-या मालमत्तेची माहिती मतदारांना कळू नये याची काळजी घेतेली आहे

२)काही जणांच्या स्थावर मालमत्तेत कमाल शेतजमीन धारणा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते पण अधिका-यांना ते दिसत नाही.

३)काही उमेदवाराच्या नातेवाईकांच्या डझनावारी कंपन्या आहेत.त्या कंपन्या काय उद्योग करतात हे समजत नाही तरीही त्यांच्या उत्पन्नात मात्र भरीव वाढ झालेली दिसते. यातील बहूसंख्य कंपन्या विभक्त (फक्त देखाव्यासाठी) मूले किंवा नातेवाईकांच्या नावावर असल्याने त्यांची माहिती विवरण पत्रात देणे आवश्यक नसते.यातील बहूतेक कंपन्या स्थावर मालमत्तेच्या व्यवसायात आहेत.

४) आपल्या नावावर जमीन घेतल्यास ते डोळ्यावर येते म्हणून अनेकांनी अशा कंपन्यांच्या नावावर जमीनी घेतल्या आहेत.

५)काहीजणांनी आपल्या विवरण पत्रात शेअर्सची रक्कम दिली आहे परंतू ते कोणत्या कंपनीचे आहेत याची माहिती दिलेली नाही.


ही माहिती फारशी गोपनीय किंवा न मिळता येण्याजोगी आहे अशातला भाग नाही.कंपनीचे नाव माहिती असेल तर केंद्र शासनाच्या http://www.mca.gov.in/DCAPortalWeb/dca/MyMCALogin.do?method=setDefaultProperty&mode=31 या लिंकवर तीच्या बद्दलची माहिती मिळू शकते. काही माहिती मोफत तर विवरणपत्रे वगैरे माहिती थोडीशी फी भरल्यानंतर मिळू शकते. कंपनीचे नाव माहिती नसेल तर काही संकेत स्थळे फक्त नावावरून कोणत्या व्यक्तीच्या नावावर कोणत्या कंपन्या आहेत याची माहिती देतात . त्यातील एक लिंक येथे देत आहे https://www.zauba.com/company_search  यात कोणाचेही नाव टाकल्यास त्या व्यक्तीच्या कंपन्यांची माहिती मिळू शकते. एकदा प्रयत्न करून तर पहा आपल्या गरीब उमेदवाराच्या नातेवाईकांची खरी परिस्थिती काय आहे ती .या नातेवाईकांचे कोण कोण भागीदार आहेत त्यांचे आणखी पुढे कोण भागीदार आहेत याची माहिती घेतल्यास बरेच काही उघडकीस येउ शकते.